“दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार आहे. यात ३ मंत्री आणि ३ जावई असल्याचं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला. ते मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.”

“ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का?”

“ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का? हिंदूह्रदयसम्राटांचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही,” असंही मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.

“शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं?”

किरीट सोमय्या म्हणाले, “समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय.”

हेही वाचा : “अजित पवार यांच्यात हिंमतच नाही”, जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचारावरून किरीट सोमय्यांचा निशाणा

“समीर वानखेडे यांच्यावरील आरोपानंतर अमित शाह यांनी एसआयटी पाठवली. त्यांनी वानखेडेंवर शाहरूख खानकडून ५० कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारदाराला चौकशीसाठी पाठवण्यास सांगितलं. पण ते घाबरले आणि त्या दोन खोटारड्यांना अंडरग्राऊंड केलं. ते एसआयटीच्या समोर आलेच नाहीत. एनसीबीची टीम परत गेली. नवाब मलिक यांनी तक्रारदारांचं अपहरण केलं. ते आहे कुठे?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

“ठाकरे-पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केलं”

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करणार अशी शपथ घेतली होती वाटतं. जिथं पाहा तिथं घोटाळे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भलेही महाराष्ट्राला भ्रष्ट्राचारयुक्त केलं असेल, पण आम्ही त्यांचं आव्हान स्विकारत महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करू. ठाकरे-पवारांनी मराठी माणसाच्या अस्मितेचं नाव घेत हे महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केलं आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kirit somaiya say will expose 6 corruption of thackeray government after diwali pbs

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या