भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे आज खार पोलीस स्थानकामध्ये जाऊन शनिवारी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील खोट्या एफआयआरबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली नाही असा दावा सोमय्यांनी केलाय. ठाकरे सरकारने त्यांच्या गुंडांना वाचवण्यासाठी खोटी एफआयआर दाखल करुन घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. आपली तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत पोलिसांनी आपल्या समोरच कागद फाडल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केलाय. या प्रकरणामध्ये आपण उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्यांचही सोमय्या म्हणालेत.

नक्की वाचा >> राऊतांच्या ‘टोमॅटो सॉस लावून फिरणारा माथेफिरु’ टीकेवर सोमय्यांचं उत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या माफिया…”

एफआयआर खोटी असल्याचं मान्य केलं पण…
किरीट सोमय्या हे आज दुपारी १२ च्या सुमारास खार पोलीस स्थानकामध्ये खोट्या एफआयआरसंदर्भात तक्रार करण्यासाठी दाखल झाले. मात्र जवळजवळ दीड तास पोलीस स्थानकामध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ठाकरे सरकारबरोबरच पोलिसांवरही गंभीर आरोप केले. माझ्या नावाने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर स्वाक्षरी नव्हती असं सोमय्या म्हणाले. पोलिसांनीही ही एफआयआर खोटी असल्याचं मान्य केलं. पण त्याविरोधात माझी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मात्र अशाप्रकारे गुंडांना वाचवण्यासाठी माझ्यावर झालेल्या हल्ल्यातील प्रकरणामध्ये खोटी एफआयआर नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं सोमय्या म्हणाले. आपली तक्रार दाखल करुन घेण्यात आलेली नाही त्यामुळेच आपण उद्या राज्यपालांची भेट घेणार असून दुपारी साडेबारा वाजता ही भेट घेणार असल्याचं सोमय्या म्हणालेत.

एवढी लुच्चागिरी फक्त ठाकरे सरकारच करु शकते
खार पोलीस स्थानकामध्ये जाण्याआधी सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकावर टीका केलेली. “कुठला बोगस किरीट सोमय्या उभा केला, कमांडोची मारहाण झाली हे लिहिलच नाहीय. किरीट सोमय्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये ७०-८० शिवसैनिक गुंडगिरी करत होते हे लिहिलं नाहीय. काय लिहिलंय उद्धव ठाकरेंच्या पोलीसने तीन किलोमीटर लांब शिवसैनिक होते. अरे टीव्ही चॅनेल लाइव्ह दाखवत होते. एवढी लुच्चागिरी फक्त ठाकरे सरकारच करु शकते,” असा टोला लगावला.

नक्की वाचा >> शिवसेना ‘माफिया सेना’ असा उल्लेख करत सोमय्या म्हणाले, “माझ्या हत्येचा प्रयत्न झाला पण महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं…”

सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत…
तसेच पुढे बोलताना सोमय्यांनी, “मी काल दिल्लीला जाऊन सांगितलं तर ते म्हणाले ब्रिंग इट ऑन रेकॉर्ड. म्हणून खार पोलीस स्थानकात जाऊन अधिकृत तक्रार देणार. ज्या अधिकाऱ्याने माझ्या नावाने खोटी स्वाक्षरी केलीय, खोटी एफआयआर केलीय त्याच्यावर तातडीने कारवाई करा. खरी घटना, सीसीटीव्ही फुटेज सीआयएसएफला हवे आहेत,” असंही सांगितलंय.

तर आम्ही न्यायालयात जाणार
“आम्ही राज्यपालांना भेटणार, केंद्रीय गृहसचिवांना अपडेट, गरज पडली, ठाकरे सरकारने कारवाई नाही केली. किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कमांडो, सरकारी कर्माचाऱ्याला माजी महापौरांनी मारहाण केलीय. गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्थानकाच्या आवारात गुंडगिरी गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे सर्व सेक्शन उद्धव ठाकरे सरकारने नाही लावले तर आम्ही न्यायालयात जाणार,” असं सोमय्या म्हणाले.

बारीक दगड लागल्याचं म्हटलंय.
माजी महापौरांसहीत शिवसैनिकांना अटक करुन जामीन मिळाला असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असताना सोमय्यांनी, “अरे बनवाबनी आहे. त्यांनी सुरक्षारक्षकांना मारलं. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे सर्व सेक्शन लावावे लागणार,” असं उत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंनी स्वत: एक फर्जी एफआयआर केली आणि त्यात लिहिलं किरीट सोमय्या असं म्हणतात की फक्त एकच बारीक दगड लागला. ही एफआयआर आहे. तिथं कोणीच नव्हतं असं लिहिलंय. एफआयआरची भाषा वाचल्यावर लक्षात येतं की मधला भाग गायब आहे. फर्जी एफआयआर हे माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेच करु शकतात,” असं सोमय्या म्हणालेत.

हत्येचा प्रयत्न झाल्याचा दावा…
राऊत यांनी केलेल्या या टीकेचा संदर्भ देत सोमय्यांना प्रश्न विचारण्यात आला. राऊत यांनी तुम्हाला टोमॅटो सॉस लावून फिरवाणार माथेफिरु असं म्हटलं असून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असंही म्हटलंय, असं पत्रकारांनी सोमय्यांना सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेनं आपली हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. “उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलंय,” असं सोमय्या म्हणाले.

राज्यातील जनतेचं प्रेम पाठीशी आहे
“तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला गेला. कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले. अनेकांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक जेलमध्ये आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अमुक जामीनावर आहे. म्हणून ठाकरे सरकार कापायला लागलीय. म्हणून मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.पण किरीट सोमय्याच्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. उसका बाल भी बाँका नहीं होगा,” असं सोमय्या म्हणाले.