शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेव नूये. तसेच वेळप्रसंगी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. सुमारे ३० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावर टप्प्याटप्प्यावर स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल विरोधी पथकाचे सशस्त्र जवानांचा बंदोबस्त आहे.

मोर्चामुळे मुंबईतील वाहतुकीच्या मार्गात बदल केल्याचे चर्चा होती. मात्र, मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्ते वाहतुकीच्या मार्गात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सर्व मार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरु असेल. वाहतुकीत बदल झाल्यास त्याची माहिती तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी वेळप्रसंगी नियंत्रण कक्षाशी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी शिस्त पाळावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याशिवाय मोर्चामुळे शहरात वाहतूक खोळंब्यासह अन्य प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महत्त्वाच्या टप्प्यांवर राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल विरोधी पथक, मुंबई पोलिसांची वज्र पाणतोफ, श्वान पथक सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय साध्या गणवेशातील अधिकारी मोर्चात मिसळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार आहेत. त्यासोबत मुख्य नियंत्रण कक्षासह, पूर्व, मध्य आणि दक्षिण प्रादेशिक विभागातील नियंत्रण कक्षांमध्ये सीसीटीव्हींच्या माध्यमातून मोर्चावर नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kisan long march in mumbai traffic updates no diversions proposed on any road says mumbai police
First published on: 12-03-2018 at 10:09 IST