गानसरस्वती किशोरी आमोणकर!

आपल्याच कलेचं विच्छेदन करून पाहण्याची अद्भुत क्षमता असणाऱ्या, आपल्या सर्जनाचं विचारात सुस्पष्ट विवेचन करू शकणाऱ्या, दुर्मिळ कलावंत म्हणजे किशोरीताई आमोणकर. भरगच्च मजकूर असलेल्या ‘लोकप्रभा’च्या ४४ व्या वर्धापनदिन विशेषांकाचे विशेष आकर्षण म्हणजे साक्षात गानसरस्वती म्हणून गौरविल्या गेलेल्या किशोरीताईंची मुकुंद संगोराम यांनी घेतलेली दुर्मिळ मुलाखत. रागविचारांसंदर्भातली आपली प्रक्रिया सांगताना, तिचं विश्लेषण करताना परखडपणे ‘‘कलानंद ही काही चूष नव्हे’’ असं सांगण्याइतका दरारा त्यांनी कसा मिळवला आहे याची उकल या मुलाखतीतून होते.

अवघ्या काही वर्षांमधल्या तंत्रज्ञानामधील बदलाने मानवी जीवन वेगाने बदललं आहे. जैवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बदलाचा हा झपाटा यापुढच्या का़ळात तर अधिकच वाढणार आहे. त्यामुळे वैद्यकशास्त्रामधली उपचारपद्धती कशी सकारात्मकरीत्या बदलणार आहे, यावर भाष्य केले आहे जिनोम प्रकल्पामध्ये  ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या तसंच  येल युनिव्हर्सिटीमधील सेंटर फॉर जिनोम अ‍ॅनालिसिसचे कार्यकारी संचालक असलेल्या  प्रा. डॉ. श्रीकांत माने यांनी. तर तंत्रज्ञानातील बदलाचा झपाटा आपल्या जीवनात नेमके कोणते बदल करेल आणि त्याचा काय परिणाम होईल याची चर्चा केली आहे, आयआयटीतील प्राध्यापक तसंच तंत्रज्ञानातील विशेष प्रकल्पांचे विशेषज्ज्ञ प्रो. दीपक फाटक यांनी.

‘दंगल’ सिनेमातून पुरुषांच्या म्हणून माानल्या गेलेल्या क्षेत्राचे मुलींना कसे वावडे उरलेले नाही, याचे चित्रण करण्यात आले होते. त्या निमित्ताने ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मुलींनी कुस्ती पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग अशा खेळांमध्ये कशी बाजी मारली आहे, याचा शोध घेतला आहे.दातृत्व या संकल्पनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेणं हे ‘लोकप्रभा’च्या वर्धापनदिन अंकाचं वैशिष्टय़ असतं. त्याला जागत ‘निसर्गदत्त दागिने जाळू नका’ या लेखात पुरुषोत्तम पवार यांनी नेत्रदान, अवयवदान, देहदान या चळवळी, त्यांचं वास्तव यांचा आढावा घेतला आहे.