मुंबईतील मशीद बंदरजवळील दाणाबंदर परिसरात लागलेल्या आगीचे कारण आता समोर आले आहे. पतंगीचा मांजा ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने ही आग लागल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशीद रेल्वे स्थानकाजवळील दाणाबंदर परिसरातील गोदामाला सोमवारी संध्याकाळी आग लागली होती. या घटनेत     गोदामासह १५ ते २० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. मिड डे या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार झोपड्यांमध्ये राहणारी सहा लहान मुले पतंग उडवत होते. १३ वर्षाच्या रमजान नामक तरुणाची पतंग ओव्हरहेड वायरमध्ये अडकली. रमजानने पतंग सोडवण्यासाठी मांजा खेचला. यामुळे ओव्हरहेड वायरमधून ठिणगी बाहेर पडली. ही ठिणगी एका झोपडीवर पडली आणि झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाला.

सिलिंडर स्फोटानंतर झपाट्याने आग पसरत गेली. आगीत दुकान आणि वाहनही जळून खाक झाले. आम्ही सर्वप्रथम लहान मुलांची आगीतून सुटका केली अशी माहिती रमझानच्या काकांनी दिली. आम्ही आधी ब्लँकेटच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग झपाट्याने अन्य झोपड्यांमध्ये पसरली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

सोमवारी संध्याकाळी दाणाबंदर येथे एलएलसी कम्पाऊंड येथील गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीमुळे मध्य रेल्वेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. या आगीत सहा लहान मुले होरपळली असून त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील रमजान शेख हा १३ वर्षाचा मुलगा ८० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kite manja caused fire in masjid bandar slum
First published on: 24-01-2017 at 16:53 IST