गुडघे रोपण शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांच्या लुटीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाने या शस्त्रक्रियांमध्ये वापरली जाणारी सामग्री व अवयवांच्या किमतीवर र्निबध लावले आहेत. मात्र प्राधिकरणाने दिलेल्या नियमांची पूर्तता होत आहे की नाही हे तपासण्यासाठी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन परिस्थिती तपासा, असा आदेश राज्यांमधील अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आला आहे.
भारतात दीड ते दोन कोटी रुग्णांना गुडघे रोपण शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र या शस्त्रक्रियांच्या किमती काही लाखोंमध्ये असल्याने सर्वच रुग्णांना शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. यापूर्वी गुडघे रोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सामग्रीच्या किमती लाखोंपर्यंत पोहोचल्या होत्या. रुग्णांची लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाने गुडघे रोपण शस्त्रक्रियेतील सामग्रीच्या किमती सर्व रुग्णालयांना बंधनकारक केल्या आहे. मात्र रुग्णालयांमध्ये या नियमावलींची अंमलबजावणी होत आहे की नाही हे तपासण्यासाठी केंद्राने रुग्णालयांना अचानक भेटी देण्याचे आदेश दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले. बुधवारी केंद्राकडून हा आदेश आला असून काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये गुडघे रोपण शस्त्रक्रियेच्या किमतीबाबत भेटी देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत मुंबई व राज्यभरातील महत्त्वाच्या मोठय़ा रुग्णालयांना भेटी देण्यात येईल. याबाबत राज्यभरातील एफडीए केंद्रांना सूचित करण्यात आले आहे, असेही दराडे यांनी सांगितले.
रुग्णालयांना भेट देताना गुडघे रोपण शस्त्रक्रियेतील सामग्री कुठून खरेदी केली, वैद्यकीय सामग्री खरेदी-विक्री करण्याचा कंपनीचा परवाना आहे का, रुग्णाला बिल देताना गुडघे रोपण शस्त्रक्रियेच्या सामग्रीची किंमत वेगळ्या रकान्यात देण्यात आली आहे का, यांसारख्या प्रश्नांवर ही तपासणी करण्यात येणार आहे.
प्राधिकरणाने ठरविलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असेही दराडे यांनी सांगितले. हृदयरोग अँजिओप्लास्टी उपचारांमध्ये वापरलेल्या स्टेंटमध्ये नफेखोरी होत असल्याचा अहवाल यापूर्वी महाराष्ट्र एफडीएने दिला होता. त्याची दखल घेत एनपीपीने स्टेंटच्या किमतीवर दरकपात लागू केली. आता गुडघे रोपण शस्त्रक्रियेतील सामग्रीत होणारी नफेखोरी समोर आणली व त्यावर र्निबध लावण्यात आले.