मुंबई : अपघातामुळे गुडघ्याला झालेली गंभीर दुखापत, गुडघा व पाय यामधील रक्तवाहिन्या वा पायाच्या दोन्ही हाडांना जोडणाऱ्या कमकुवत झालेल्या अस्थिबंध किंवा सांधेदुखीमुळे गुडघा प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) गुडघा बदलण्याच्या प्रणालीसाठी आवश्यक कृत्रिम सांध्याच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महागण्याची शक्यता आहे.

मांडीचे हाड व पायाचे हाड यांना जोडणारा अस्थिबंध खराब झाल्यास नागरिकांना चालणे मुश्किल होते. अस्थिबंध खराब झाल्याने डॉक्टर कृत्रिम सांधा बसविण्याचा सल्ला देतात. त्यानुसार गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येते. गुडघा प्रत्यारोपणामध्ये गुडघ्याचा वेदनादायक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसविण्यात येतो. गुडघा प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये मांडीच्या हाडाचे किंवा खालच्या पायाच्या हाडाचे टोक बाहेर काढले जाते. तेथे कृत्रिम सांधा बसविण्यात येतो. काही दिवसांपूर्वी कृत्रिम सांध्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची किंमत वाढविण्यास परवानगी मिळावी यासाठी एनपीपीएला विनंती केली होती. त्यानुसार एनपीपीएने कृत्रिम सांध्याच्या प्रत्यारोपणाबाबत विविध मते मागवून निरीक्षण केले. त्यानुसार कृत्रिम सांध्याच्या किंमतीमध्ये पुढील वर्षभरासाठी १० टक्क्यांनी वाढ करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. १६ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी ही वाढ लागू असेल किंवा पुढील सूचनेपर्यंत ही वाढ लागू असेल, असे एनपीपीएकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेत बोनसचे वारे, २० टक्के बोनसची मागणी

हेही वाचा – “हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव…”, सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुडघा रोपणासाठी आवश्यक असलेल्या कृत्रिम सांध्याची किंमत साधारणपणे ३५ ते ४५ हजार रुपये आहे. मात्र एनपीपीएने दिलेल्या निर्णयामुळे यापुढे या सांध्याच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल. त्यामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या खर्चामध्ये साधारणपणे वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.