अंधेरी येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय भूखंडावरील उपनगरातील सर्वात महागडे रुग्णालय म्हणून प्रसिद्धीला आलेल्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाकडून शेजारी असलेल्या आरक्षित भूखंडाचा वापर बेकायदा पार्किंगसाठी केला जात आहे. या भूखंडावर आमचा हक्क असून तो भविष्यात रुग्णालयाकडून बळकावला जाईल, अशी भीती मॉडेल टाऊन फेडरेशनने वर्तविली असून तशी तक्रार उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांना शिवसेना-भाजप युती शासनाने हा सुमारे १२,०५० चौरस मीटरचा भूखंड नाममात्र प्रतिवर्ष एक रुपया दराने वितरित केला होता. परंतु डॉ. मांडके यांचे निधन झाल्यानंतर अपुरे राहिलेले रुग्णालय अनिल अंबानी यांच्या कंपनीने पूर्ण केले. हा भूखंड ‘मालती वसंत हार्टट्रस्ट’च्या नावे वितरित झाला होता. डॉ. मांडके यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके या एक विश्वस्त आहेत. मात्र या रुग्णालयाचे ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाची मालकी बदलण्यात आल्याबाबत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे.
या रुग्णालयासमोर मनोरंजनासाठी आरक्षित असलेला सुमारे एक एकरचा भूखंड असून तो अद्याप कोणालाही वितरित करण्यात आलेला नाही. मात्र रुग्णालयाकडून या भूखंडाचा पार्किंगसाठी वापर केला जात आहे. याबाबत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्ष भेट देऊन ही बाब अधोरेखितही केली आहे. याबाबत मॉडेल टाऊन फेडरेशनने आक्षेप घेत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. परंतु प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हा भूखंड कोणालाही वितरित करण्यात आलेला नाही वा त्यावर अतिक्रमण झालेले नाही. पार्किंगसाठी वापर केला जात असल्यास रुग्णालय प्रशासनाला समज देण्यात येईल. कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधला असता, मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रुग्णालयाकडून या आरक्षित भूखंडाचा पार्किंगसाठी वापर केला जात नाही. रुग्णांचे नातेवाईक पार्किंगसाठी वापर करीत असतील, तर त्यावर आमचे नियंत्रण नाही.

पार्किंगसाठी वापरला जात असलेला भूखंड हा अभिन्यासातील मनोरंजन भूखंड असल्यामुळे त्यावर फेडरेशनचा हक्क आहे. त्यासाठी शासनाशी १९८५ पासून पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु त्याआधीच रुग्णालयाने पार्किंगसाठी त्याचा वापर सुरू केल्यामुळे भूखंड हडप केला जाण्याची शक्यता आहे
मॉडेल टाऊन फेडरेशन