प्रथमच तरतूद; तीन प्रकल्पांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी

कोकण रेल्वे महामंडळाच्या स्थापनेपासूनच या महामंडळाकडे रेल्वेने केलेल्या दुर्लक्षाचे क्षालन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदा केले आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात खास सुरेश प्रभू यांच्या आग्रहानंतर कोकण रेल्वे महामंडळालाही स्थान मिळाले आहे. यंदा रेल्वेसाठी देण्यात आलेल्या निधीमधून कोकण रेल्वे महामंडळासाठीच्या प्रकल्पांसाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अखत्यारीतील अनेक प्रकल्पांना गती मिळणार असून यंदा तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एकूण ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोकणात रेल्वेमार्ग बांधण्यासाठी तयार झालेल्या कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना जुलै १९९०मध्ये झाली. त्यानंतर आतापर्यंत बाजारपेठेतील वाटय़ावर कोकण रेल्वे महामंडळाला अवलंबून राहावे लागत होते. याआधी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेला मदत करावी, यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले होते. कोकण रेल्वेमार्गावरील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडल्याचेही बोलले जात होते. रायगडचे सुपुत्र अशी ओळख असलेले सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यावर कोकण रेल्वेच्या आणि कोकणातील प्रकल्पांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आतापर्यंत या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या, तरी यंदा अर्थसंकल्पात कोकणासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे महामंडळासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून काही आर्थिक तरतूद करण्यात यावी, ही खूप जुनी मागणी होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांमुळे आणि इच्छाशक्तीमुळेच यंदाची तरतूद झाली आहे. कोकण रेल्वेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.

प्रकल्पांना गती मिळणार

  • यंदा रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन झाला. हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर रेल्वेसाठीच्या तरतुदी दोन दिवसांनी रेल्वे मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आल्या.
  • या तरतुदींमध्ये कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी २०० कोटी रुपये समभागाच्या माध्यमातून, वीर-दासगाव ते रोहा यांदरम्यान दुपदरीकरणासाठी समभागाच्या माध्यमातून १०० कोटी रुपये आणि कराड-चिपळूण या नव्या मार्गासाठी ३०० कोटी रुपये या तब्बल ६०० कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी स्पष्ट केले.


// ]]>