सुहास जोशी/अमर सदाशिव शैला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २५ दिवसांत मुंबई आणि उपनगरांतून हजारो कामगारांनी स्थलांतर केल्यामुळे अनेक कामगार वस्त्यांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. साकी नाका येथील खैराणी रोड, संघर्ष नगर, खेतवाडी, बेहराम पाडा येथील अनेक वस्त्यांमधील घरांना टाळे लागले आहेत. तर छोटय़ा औद्योगिक वसाहतींत कामाच्याच ठिकाणी कामगार राहत असल्यामुळे या वसाहतींत शुकशुकाट झाला आहे.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरित कामगारांनी मिळेल त्या वाहनाच्या आधारे हे शहर सोडून जाण्यास सुरुवात केली. दुसऱ्या आठवडय़ात रेल्वेगाडय़ा आणि एसटी बसगाडय़ांची संख्या वाढल्यानंतर कामागारांचे लोंढेच्या लोंढे शहरातून बाहेर पडू लागले, ते अजूनही थांबलेले नाहीत. बहुतांश परप्रांतीय मजूर, कामगार वर्ग एकाच वस्तीत, चाळीत वा कामाच्या ठिकाणीच राहत असल्याने तेथील वस्त्यांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.

साकी नाका परिसरातून सुमारे ५० हजार स्थलांतरित त्यांच्या गावी गेले आहेत. या परिसरातील खैराणी रोड, संघर्ष नगर या ठिकाणी स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे. खैराणी रोडवर फर्निचर, विविध धातुकामांच्या छोटय़ा छोटय़ा वसाहती आहेत. येथील छोटे गाळे हेच दिवसभर कामाचे ठिकाण आणि रात्रीचे विश्रांतिस्थानही. टाळेबंदी झाल्यानंतर या प्रत्येक गल्लीमध्ये किमान हजारभर कामगार होते. मात्र आज हे सर्व गाळे बंद असून, १५ ते २० कामगार उरले आहेत. तेसुद्धा मूळ गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

संघर्ष नगर या प्रचंड मोठय़ा झोपु योजनेतील इमारतींमध्ये अर्ध्याहून अधिक स्थलांतरित मजूर भाडय़ाने राहात होते. गेल्या २० दिवसांत त्यांनी ही घरे सोडली आहेत. प्रत्येक मजल्यावरील किमान दोन ते तीन बंद घरे दिसतात. जवळच असलेल्या केवळ मजुरांसाठीच्या एका मोठय़ा इमारतीत आता पूर्ण शुकशुकाट आहे.

खेतवाडी परिसर हाही स्थलांतरित मजुरांचा मोठा भाग. पिला हाऊस, फॉकलंड रोड, मोमीनपुरा, मदनपुरा या ठिकाणी त्यांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या येथील अनेक चाळींमध्ये स्थलांतरित कामगार राहताना दिसतात. अत्यंत धोकादायक स्थितीतील या उपकरप्राप्त इमारतीत एकेका खोलीत ३० ते ४० कामगार राहायचे. हे सर्व कामगार मुख्यत: कापड व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात काम करायचे. सध्या या ठिकाणच्या सर्व कामगारांनी मुंबई सोडली आहे.

अलगीकरणात अडकले

कांदिवली येथील दामू नगरात १५ दिवसांपूर्वी एका ठरावीक भागांतील सर्वच घरे बंद होती. त्यातील अर्ध्याहून अधिक मजूर मूळ गावी गेले आहेत, तर त्या भागाला प्रतिबंधित करण्यात आल्याने उर्वरित सर्वाना अलगीकरणात ठेवले होते. गेल्या आठवडय़ात हे मजूर परत आल्याने तेथे काही वर्दळ असली तरी त्यांनाही आता मूळ गावी जाण्याचे वेध लागले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labor free colonies due to migration abn
First published on: 27-05-2020 at 00:20 IST