रात्री लॅपटॉपवर काम करुन झाल्यानंतर तो तसाच चार्जिंगला लावून झोपणं किती महागात पडू शकतं हे निशांत केडिया यांच्यासोबत झालेल्या दुर्घटनेवरुन लक्षात येऊ शकतं. बेडवर चार्जिंगला लावून ठेवलेल्या लॅपटॉपचा स्फोट झाल्याने निशांत यांचा संपुर्ण चेहराच जळाला आणि त्यांना गंभीर जखमाही झाल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निशांत यांना कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारासाठी त्यांना रांचीहून मुंबईमधील ताडदेव येथील भाटिया रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. गेले कित्येक महिने तणाव आणि वेदनेशी लढा दिल्यानंतर सोमवारी निशांत आपल्या पायावर उभे राहिले. मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी आता ते सज्ज आहेत.

पूर्ण बरं होण्यासाठी निशांत यांना बराच वेळ लागणार आहे. आपल्या वडिलांना पुन्हा घरी आलेलं पाहून त्यांच्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. “डॉक्टरांनी निशांत यांना घरी गेल्यावर तब्बेतीत लवकर सुधारणा होईल असं सांगितलं आहे”, अशी माहिती त्यांच्या चुलत भावाने दिली आहे. दोघेही रांचीमध्ये सिमेंटचा व्यवसाय करत होते. या दुर्घटनेनंतर व्यवसायालाही फटका बसला. निशांत यांनी पत्नी आपल्या दोन्ही मुलांसोबत वडिलांच्या फ्लॅटमध्ये राहत आहे.

९ डिसेंबर २०१७ ला निशांत आपल्या बेडरुममध्ये लॅपटॉपवर काम करत होते. झोप आल्यानंतर त्यांनी लॅपटॉप तसाच चार्जिंगवर ठेवला आणि झोपी गेले. मध्यरात्री लिव्हिंग रुममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नीला काहीतरी स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यांनी बेडरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण आगीमुळे निर्माण झालेल्या हवेच्या दबावामुळे दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा उघडल्यानंतर शेजाऱ्यांना पाण्याच्या मदतीने आग विझवली.

“संपुर्ण रुम जळाली होती. फर्निरचा एक तुकडाही वातला नव्हता. निशांत यांनी प्रसंगावधान दाखवत शॉवर घेतला. अन्यथा जखमा अजून गंभीर झाल्या असत्या”, अशी माहिती प्रदीप यांनी दिली आहे.

उपचारासाठी निशांत यांना मुंबईत आणण्यात आलं. त्यांचा संपूर्ण चेहरा, ओठ, पाठ आणि पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या कानाला, नाकालाही अत्यंत गंभीर जखमा झाल्या होत्या. आपण या दुर्घटनेतून वाचलो हा एक चमत्कार असल्याचं निशांत यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laptop explodes while kept on charging on bed causes burn
First published on: 30-05-2018 at 17:17 IST