नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून नेहरू घराणे आणि काँग्रेसवर नेहमीच टिकेची तोफ डागली जाते. पण त्या मोदींना नेहरू घराण्याचे गुणगान ऐकण्याची वेळ आली तर..हा प्रसंग महालक्ष्मी रेसकोर्सवर सोमवारी घडला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीताने पंडितजींच्या डोळ्यात अश्रू आले. हा प्रसंग आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणी लतादीदींनी सांगितल्या. अनेक गायक, संगीतकार यांच्यासोबत त्या २६ जानेवारीला हे गीत सादर करण्यासाठी नवी दिल्लीला गेल्या. फारशी तयारी करण्यास वेळ मिळाला नसताना  लतादीदींनी शहीदांच्या स्मृती व अजोड त्याग सर्वाच्या डोळ्यांसमोर उभा केला. या गीतातील भाव मनाला भिडल्याने पंडितजींचे डोळे पाणावले. ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी आपले खूप कौतुक करून निवासस्थानी चहापानालाही बोलावले. ..लतादीदी सांगत होत्या.  ‘मी पंडितजींच्या बंगल्यावर गेल्यावर एका कोपऱ्यात अंधाऱ्या जागेत उभी होते. इंदिरा गांधी मला शोधत तेथे आल्या. त्यांनी मला पुढे नेले. सर्वाशी ओळख करून देऊन कौतुक केले. माझे गीत भलतेच आवडलेल्या दोन मुलांना त्यांनी बोलाविले. ते दोघे म्हणजे राजीव आणि संजय गांधी होते..लतादीदींनी हा  प्रसंग उलगडला आणि मोदींच्या उपस्थितीत पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला.
युद्धापेक्षा दहशतवादी हल्ल्यांमध्ये अधिक जवान शहीद होत आहेत. युद्धाचे स्वरूप आज पालटले आहे, असे प्रतिपादन करून देशाने एवढी युद्धे आतापर्यंत झेलली. त्यात शहीद झालेल्यांचे स्मरण करून देण्यासाठी ‘युद्ध स्मारक’ साकारले पाहिजे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.