सध्याच्या धावत्या जगाच्या काळात माणसांचा पेहराव, आभूषणे, सौंदर्यशैली यांच्यातही वेळोवेळी बदल होत जातात. किंबहुना ‘फॅशन’ हे तंत्रज्ञानाइतकंच झटपट बदलणारं क्षेत्र आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात बाजारात आलेली कपडय़ांची एखादी ‘स्टाइल’ चालू महिन्यात ‘आऊटडेटेड’ही झालेली दिसते. अशा परिस्थितीत फॅशनजगतात सध्या काय कल सुरू आहे, कसली चलती आहे, ते कुठून, कसे मिळवता येईल, याचा आढावा घेणारे हे सदर आजपासून दर शनिवारी..
किराणा मालाच्या दुकानात गेल्यास समोर काचेच्या बरणीत रंगीबेरंगी कँडीज ठेवलेल्या असतात. लाल, गुलाबी, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या या कँडी दिसायला तर सुंदर असतातच पण तोंडात टाकल्यावर त्याची आंबटगोड आपल्याला चव पुन्हा बालपणात घेऊन जाते. शाळा सुटल्यावर धावत जाऊन समोरच्या दुकानातून कँडी विकत घेणारे आपले हात पुन्हा त्या बरणीकडे वळतात. कल्पना करा, हेच कँडी कलर आपल्या कपडय़ांमध्ये उतरले तर? बहुधा याच कँडीच्या रंगीबेरंगी दुनियेची भुरळ डिझायनरनासुद्धा पडली आहे. त्यामुळेच सध्या कपडय़ांच्या बाजारपेठासुद्धा या कँडी रंगात रंगून गेल्या आहेत.
कपडय़ांच्या बाबतीत आपल्याकडे प्रामुख्याने लाल, पिवळा, निळा, हिरवा, नारंगी अशा गडद रंगांना पसंती दिली जाते. अगदी आपल्या साडय़ांपासून ते थेट रोजच्या वापरातील टॉप, टय़ुनिक, कुर्त्यांमध्ये हे रंग सर्वाधिक असतात. त्यानंतर बिस्किट शेड, क्रीम, गुलाबी, आकाशी अशा ठरावीक फिकट शेड्सची वर्णी लागते. काळा आणि सफेद रंग वॉर्डरोबमध्ये हमखास असतोच. यापुढे मात्र आपली यादी आखडते. पण सध्या या पलीकडे जाऊन बाजारपेठा सुंदर कँडी शेडमध्ये सजल्या आहेत. या विभागात रंगाच्या ब्राइट किंवा भडक आणि फिकट अशा दोन्ही शेड्स पाहायला मिळतात. भडक रंगांमध्ये रासबेरी रेड, टोमॅटो रेड, ब्राइट गुलाबी, निळा, नारंगी, हिरवा या शेड्स आहेत. पण यांची खरी गंमत आहे ती रोझ, बेबी पिंक, लिलॅक, बेबी ब्ल्यू, मिंट, कोरल, लेमन, पीच, सी ग्रीन, स्मोकी ब्ल्यू, लाइट ब्राऊन अशा खास फिकट शेड्समध्ये. आपल्याकडील सावळ्या स्किनटोनला उजळ, गडद रंग चांगले दिसतात. फिकट रंग हे प्रामुख्याने उजळ स्किनटोन असलेल्यांनाच शोभून दिसतात, असा आतापर्यंत आपल्याकडे समज होता. त्यात या शेड्स पाश्चात्त्य ब्रँडेड दुकानात सहज पाहायला मिळायच्या. त्यामुळे यांच ‘इंग्लिश कलर्स’ असं गोंडस नामकरणसुद्धा आपल्याकडे झालेलं. पण आता हेच इंग्लिश बाबूंचे रंग देशी अवतारात आले आहेत आणि त्याला कोणत्याही स्किनटोनचे बंधन नाही. फक्त तुम्ही कसे वापरता ही बाब महत्त्वाची आहे.
मसाबा गुप्ता, वेंडेल रॉड्रिक्स यांसारख्या डिझायनर्सनी कँडी कलर्स भारतीय कपडय़ांमध्ये आणायला सुरुवात केली. मसाबाने मागच्या वर्षीच्या कलेक्शनमध्ये कपडय़ांवर कँडी, टॉफीचे पिंट्र्स साकारले होते. सुरुवातीपासून ‘इंग्लिश कलर्स’मध्ये यांची गणना झाल्याने टॉप्स, टय़ुनिक, वन पीस ड्रेस, डेनिम्स यांमध्ये कँडी शेड्स प्रामुख्याने उपलब्ध आहेत. लिलॅक, गुलाबी, आकाशी जीन्स कॉलेजवयीन तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. नुकत्याच आलेल्या पलॅझो, फ्लेअर पँट्सच्या ट्रेंडमध्येही या रंगांनी जागा पटकावली. हल्ली सगळ्याच वयोगटातील स्त्रियांच्या लाडक्या लेगिंग्स, दुपट्टे यांमध्ये तर या शेड्स असतातच. गाऊन्स, घागरा चोली यांच्यासोबतच साडय़ांमध्येही हल्ली कँडी शेड्स पसंत केल्या जाऊ लागल्या आहेत. भौमितिक, फ्लोरल पिंट्र्ससोबत या शेड्स जुळून येतात. त्यामुळे या शेड्ससोबत अनेक प्रयोग करता येतात. मुलांच्या फॉर्मल शर्ट्समध्येही या शेड्स आता येऊ लागल्या आहेत. कपडय़ांसोबत या शेड्स शूज, सनग्लासेस, हँडबॅग्स, दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. पेस्टल शेड्सच्या स्लिंज बॅग्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हील्समध्ये विशेषत: वेजेस आणि पेन्सिल हील्समध्ये या शेड्स पाहायला मिळतात. कडे, नेकपीसमध्ये या शेड्स ट्रेंडमध्ये आहेत. मोठय़ा आकाराच्या सनग्लासेसच्या फ्रेम्स, वॉलेट्स, की-चेन, मोबाइल कव्हर्स या छोटय़ा पण महत्त्वाच्या गोष्टींमध्येही या शेड्स आहेत. मेकअपमध्ये लिपकलर, नेलपॉलिश, आयशेड्समध्ये कँडी शेड्स आहेत. यात प्रामुख्याने गुलाबी, नारंगी आणि निळ्या रंगाच्या छटा पसंत केल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे मिळतील?
* मुंबईच्या बाजारपेठांमध्ये या शेडचे कपडे हुडकायचे असल्यास तुम्हाला बांद्रा, अंधेरी येथील स्ट्रीट मार्केट पालथी घालावी लागतील. बांद्रा येथील हील रोड, लिंकिंग रोड, अंधेरीमधील लोखंडवाला मार्केट, चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीट येथे तुम्हाला कँडी शेड्सचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज सहज पाहायला मिळतात.
* मॉलमधील ब्रँडेड दुकानांमध्ये या शेड्स उपलब्ध आहेत.
* दादरसारख्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये अजून तरी कँडी शेड्स फारशा पाहायला मिळत नाहीत. पण शिवाजी पार्कच्या रस्त्याने माहीमच्या दिशेने सरळ चालत आल्यास तेथील कपडय़ांच्या दुकानांमध्ये या रंगाचे कपडे उपलब्ध आहेत.
* स्ट्रीट मार्केटमध्ये साधारणपणे १५० रुपयांपासून टॉप्स, टय़ुनिकच्या किमती सुरू होतात. तर २००-५०० रुपयांपासून कुत्रे, वन पीस ड्रेस सहज मिळतात.
* पलॅझो, जीन्ससाठी तुम्हाला ५००-१००० रुपये खर्च करावे लागतील.
* शूज, बॅग्स या अ‍ॅक्सेसरीजच्या किमती १५० पासून थेट १००० रुपयांपर्यंत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest fashion in mumbai
First published on: 16-04-2016 at 03:38 IST