विज्ञानासारखा किचकट विषय सामान्यांना सोपा आणि रंजक करुन सांगण्याची हातोटी कमावलेल्या मोजक्या मराठी लेखकांपैकी असलेले एक लक्ष्मण लोंढे (७०) यांचे गुरुवारी दुपारी २ वाजता दादरच्या धन्वंतरी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी लेखिका स्वाती लोंढे, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
बँकेत नोकरी करत असणाऱ्या लोंढे यांनी लिखाण करावयाचे म्हणून ५०व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली. यानंतर ते पूर्ण वेळ लेखन करू लागले. दुसरा आइन्स्टइन, वाळूचे गाणे, रिमोट कंट्रोल, नव्या शतकाच्या उंबरठय़ावर, आभाळ फाटलय, लक्ष्मणायन, दूर: क्षितिजापलीकडे, आणि वसंत पुन्हा बरसला, काऊंट डाऊन, करिअर, देवांसि जिवे मारिले, लक्ष्मणझुला, संघर्ष, लक्ष्मणवेध, थँक यू मिस्टर फॅरेडे अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहेत. याशिवाय कथा, विज्ञान कथा, कादंबरी, विज्ञान नाटक, विज्ञान विषयावरील लेख असे त्यांचे बहुविध लेखन होते.
जागतिक पातळीवर
पोहोचलेला मराठी लेखक
आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलेले लक्ष्मण लोंढे हे पहिले मराठी विज्ञान लेखक ठरले . दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सवरेत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९च्या आवृत्तीसाठी निवडली गेली. लोंढे यांच्या ‘दुसरा आइन्स्टान’ या पुस्तकासाठी राज्य शासनाचा सवरेत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. शांताराम कथा पारितोषिक, तसेच त्यांच्या कथाश्री या दिवाळी अंकातील ‘टपरी’ या कथेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे होतकरू विज्ञान लेखकांसाठी होणाऱ्या कार्यशाळांमध्ये लोंढे मार्गदर्शक म्हणून सहभागी होत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारा पहिला मराठी विज्ञान लेखक
उत्तम विज्ञान कथा लेखकांबरोबरच लक्ष्मण लोंढे हे उत्तम माणूसही होते. आम्ही सुमारे ३५ वष्रे एकमेकांना ओळखयचो. कोणतीही वैज्ञानिक पाश्र्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पाश्र्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. वैज्ञानिक पाश्र्वभूमी नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे. त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पण्णी करत असतं. पण या टिप्पण्णीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढेल याची काळजीही ते घेत असे. त्यांची दुसरा आइन्स्टाइन ही कथा मी संपादक असलेल्या ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात इंग्रजीत भाषांतर करून प्रसिद्ध केली. यानंतर या कथेला जेम्स गुन यांच्या लेख संग्रहात स्थान मिळाले. हे स्थान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान लेखक ठरले. त्यांच्या जाण्याने मराठी विज्ञान लेखनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– बाळ फोंडके, वैज्ञानिक व विज्ञान लेखक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman londhe no more
First published on: 07-08-2015 at 02:52 IST