महाराष्ट्र दिनानिमित्त आज भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकात जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याचबरोबर हुतात्मा स्मारकावर येऊन देखील काही राजकारणी केवळ राजकारणावरच बोलत असल्याने त्यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधत, आम्ही या ठिकाणी कुठलही राजकीय भाष्य करणार नसल्याचं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, भारताच्या सर्व जनतेला मी खूप शुभेच्छा देतो. आमचा महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर अग्रेसर राहो आणि हा महाराष्ट्र तयार करण्यासाठी ज्यांनी हौतात्म्य दिलं. अशा सगळ्यांना अभिवादन करत असताना, महाराष्ट्रातील शेवटचा व्यक्ती, दीन, दलित,गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त खऱ्या अर्थाने या राज्याने न्याय द्यावा आणि त्यांच्या जीवनात प्रगती यावी, अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या या महाराष्ट्र दिनी मी देतो.”

तसेच, “काही जणांना ही सवय असते की हुतात्मा स्मारकावर येऊन देखील राजकारणावर बोलतात. मात्र आम्ही ते करणाऱ्यातील नाही आहोत, हे हुतात्मा स्मारक आहे इथे केवळ हुतात्म्यांचं स्मरण होईल आणि महाराष्ट्र दिवसाबद्दल बोललं जाईल.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, महाराष्ट्र कलादालनाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की, “आज महाराष्ट्र दिवस आहे, काही लोक या ठिकाणी येऊन, राजकीय विधानं करतात. हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही. ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे आणि महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण येत असतो, त्यामुळे कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. मात्र महाराष्ट्र दिनाच्या निमित्त अशाप्रकारे तयार झालेलं कलादालन हे दुर्लक्षित असेल, तर त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. असं माझं मत आहे.”