सनदी अधिकारी तसेच आमदारांच्या वडाळा येथील इंडस सहकारी गृहनिर्माण संस्थेला ऐन मोक्याचा सुमारे १३ हजार चौरस मीटरचा भूखंड वितरित करण्यासंदर्भातील इरादापत्राची मुदत संपल्याने हे वितरणच रद्द झाल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली.
ही फाइल मंत्रालयाला लागलेल्या आगीत भस्मसात झाल्याचे उघड झाले असून, आता वर्षभरानंतरही ही फाइल पुनरुज्जीवित करण्यासाठी या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न न करण्यामागे हेच कारण सांगितले जात आहे. या सोसायटीमध्ये ३४ आयएएस, १३ आयपीएस, आठ अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच १७ आमदारांचा समावेश आहे. या सोसायटीला भूखंड मिळावा याबाबत इरादापत्र जारी झाले होते, परंतु त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झाला आणि ही फाइल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात धूळ खात बसली होती. आगीत नष्ट झालेल्या अनेक फायली पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु या फायलीसाठी कुणीही पुढे आले नाही. या फायलीबाबत मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर या सनदी अधिकाऱ्यांचे अवसान गळाले असावे, असे मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटय़ांना जे भूखंड बहाल झाले त्यामध्ये ‘इंडस सोसायटी’चा समावेश होता. ३१ ऑगस्ट २००९ रोजी या सोसायटीला इरादापत्र जारी करण्यात आले होते. अनेक दिग्गज आयएएस, आयपीएस अधिकारी तसेच काही आमदार या सोसायटीत होते. या बाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर ही कारवाई थांबली होती. त्यामुळे वडाळ्यातील मोक्याचा भूखंड खिशात घालण्याचा प्रयत्न तूर्तास तरी फसल्याचे मतही सूत्रांनी व्यक्त केले.
महसूल विभागाने ३१ ऑगस्ट २००९ रोजी प्रमाणित केलेल्या यादीनुसार सदस्य
आयएएस – सुधीर ठाकरे, थॉमस बेंजामिन, अजीज खान, लीना मेहेंदळे, विजय सतबीर सिंग, वंदना कृष्णा, मालिनी शंकर, राधिका रस्तोगी, असीम गुप्ता, बी. पी. सिंग, निधी पांडे, एस. चोकलिंगम, डॉ. संजय मुखर्जी, संजय खंदारे, आशीष शर्मा, प्रवीण दराडे, माधव सांगळे, संजय भाटिया, वल्सा नायर सिंह, श्रीकर परदेशी, डॉ. निरुपमा डांगे, के. शिवाजी, शाम वर्धने आदी.आयपीएस – अंकुश धनविजय, एस. पी. यादव, डॉ. निखिल गुप्ता, प्रभात कुमार, के. एम. एम. प्रसन्ना आदी. अतिरिक्त जिल्हाधिकारी – संजय यादव, पुलकुन्डवार, दिलीप गावडे, किरण पाणबुडे, महेंद्र वारभुवन आदी. आजी व माजी आमदार – राज पुरोहित, अशोक मोहोळ, हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, रामदास फुटाणे, माधव किन्हाळकर, ना. धों. महानोर, रंजना कुल, मदन बाफना.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2013 रोजी प्रकाशित
मोक्याचा भूखंड लाटण्याचा सनदी अधिकाऱ्यांचा प्रयत्न फसला!
सनदी अधिकारी तसेच आमदारांच्या वडाळा येथील इंडस सहकारी गृहनिर्माण संस्थेला ऐन मोक्याचा सुमारे १३ हजार चौरस मीटरचा भूखंड वितरित करण्यासंदर्भातील इरादापत्राची मुदत संपल्याने हे वितरणच रद्द झाल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली.
First published on: 17-04-2013 at 04:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaseholder officers plan to grab the land fails