शाळा-महाविद्यालयाचा प्रवेश, निवृत्तिवेतन, नोकरी किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या कोणत्याही गोष्टींसाठी प्रत्येकाला जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांची आवश्यकता असते. या दाखल्यांशिवाय पुढे जाताच येत नाही. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक जण हे दाखले काढत असतोच. पण विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मृत्यू आणि जन्म दाखले आपल्या पदरच्या पैशाने काढून घेण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अमेय गुप्ते करत आहेत. त्यांनी आतापर्यंत ३० मान्यवरांचे मृत्यू दाखले जमा केले आहेत. विश्वकोशाच्या संकेतस्थळावर भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या मृत्यूची तारीख चुकीची देण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील अशा मान्यवर व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूची अशी चुकीची नोंद योग्य नाही, ती बरोबरच असली पाहिजे. त्यासाठी या मोठय़ा व्यक्तींचे मृत्यू आणि जन्म दाखलेच आपण मिळवावे आणि त्याचा संग्रह करावा, असा विचार गुप्ते यांच्या मनात आला आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयात जाऊन, तेथील कर्मचारी व अधिकारी यांना भेटून आणि या दाखल्यांसाठी आवश्यक असणारे शुल्क भरून गुप्ते यांनी आतापर्यंत ३० जणांचे मृत्यू दाखले मिळविले आहेत. यात लोकमान्य टिळक, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई ऊर्फ माई सावरकर, गोहरबाई कर्नाटकी, पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, निर्माते व दिग्दर्शक मा. विनायक, दादासाहेब रेगे, संगीतकार सी. रामचंद्र, वसंत देसाई, सेनापती बापट, जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार श्री. शं. नवरे, माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार, प्रबोधनकार ठाकरे आणि अन्य मान्यवरांच्या मृत्यू दाखल्यांचा समावेश आहे.
जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी अनुक्रमे ३२ आणि २२ रुपये प्रत्येकी असे शुल्क भरून तसेच महापालिका प्रभाग कार्यालयात जुन्या नोंदींच्या वह्य़ा पाहण्यासाठीचे शुल्क भरून आपण हे दाखले मिळविले आहेत. ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जन्म दाखले आपल्याकडे आहेत. शाहू महाराज यांचे निधन मुंबईत ६ मे १९२२ रोजी झाले. पण महापालिकेच्या दप्तरी त्यांच्या मृत्यूची नोंद नसल्याने त्यांचा मृत्यू दाखला मिळू शकला नाही. या मोठय़ा व्यक्तींच्या मृत्यू आणि जन्म तारखेवरून अनेकदा वाद निर्माण होतो. तो होऊ नये आणि त्यांच्या जन्म व मृत्यूची थेट अधिकृत नोंद किंवा पुरावा आपल्याकडे असावा, या उद्देशाने आपण हे काम हाती घेतले असल्याचे गुप्ते यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
गोहरबाई कर्नाटकी यांच्या मृत्यू दाखल्यावर त्यांचे संपूर्ण नाव गोहरबाई बालगंधर्व कर्नाटकी असे देण्यात आल्याची नोंद आहे. तर पुलंच्या जन्म दाखल्यावर त्यांची आई लक्ष्मीबाई यांचे नाव नाही फक्त वडिलांचे नाव असून बाळाच्या नावाच्या जागी कसलीही नोंद नाही. तसेच पुलंचा जन्म दवाखान्यात नव्हे तर घरी झाला असल्याची तसेच जन्मतारखेची नोंद या दाखल्यावर असल्याची माहितीही गुप्ते यांनी दिली.