सणा-उत्सवांचा श्रावण संपल्याची वर्दी बुधवारपासून सुरू झालेल्या अमावस्येने दिली आणि मुंबईतल्या रस्त्यांवर, सिग्नलजवळ, बाजारपेठांत सर्वत्र लिंबू-मिरची आणि कोळशाच्या ‘तोडगा’बाजार अक्षरश उसळला. आपल्या लाडत्या वस्तूला दृष्ट लागू नये, यासाठी अनेकजण हा तोडगा वापरतात. जादूटोणा किंवा अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आला असला, तरी या तोडग्याच्या खपावर काडीचाही परिणाम झालेला नाही, हे लगेचच आलेल्या अमावस्येच्या निमित्ताने अंधश्रद्धाळूंनी जणू दाखवूनच दिले.
आज श्रावणीअमावस्या असल्याने या दृष्टमाळांची खरेदी प्रचंड वाढली. नेहमीच्या विक्रेत्यांनादेखील अगोदर याचा अंदाज न आल्याने मागणी-पुरवठय़ाच्या सिद्धांतानुसार नंतर किंमती वाढल्या, तरी खरेदीत खंड नव्हता. डॉ.दाभोलकर हत्येनंतर सरकारने तातडीने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला, पण आज नेहमीपेक्षा तिप्पट दृष्टमाळांची विक्री झाली, असे बोरीवलीतील एका सिग्नलजवळच्या विक्रेत्याने आनंदाच्या स्वरात सांगितले.