लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आणि मानव यांच्यातील सहजीवन, संघर्ष या मुद्दय़ांच्या विशेष अभ्यासाला लवकरच सुरुवात होईल.

या संदर्भातील प्राथमिक तयारी झाली असून ‘जीपीएस-जीएसएम कॉलर’ मागविण्यात आल्या आहेत. त्या जानेवारीत मिळण्याची शक्यता असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय वन मंत्रालयांना पाचच बिबटय़ांना कॉलर लावण्यास परवानगी दिली. कॉलरमुळे बिबटय़ाच्या हालचाली तपासणे शक्य होईल.

शहरी भागाजवळील जंगलातील बिबटय़ांचा अनेकदा मानवी वस्तीशी संबंध येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास असलेल्या आदिवासी पाडय़ांवर अशा नोंदी अनेकदा दिसून आल्या आहेत. बिबटय़ा हा मानवी वस्तीच्या वातावरणाशी जुळवून घेतो. त्यामुळे हा परस्पर संबंध उलगडण्यासाठी बिबटय़ांचा दूरमिती (टेलिमेट्री) अभ्यास केला जाईल.

बिबटय़ाचा मानवी वस्तीशी संबंध बिबटय़ा तेथून कायमचा गेल्यानंतर समजतो. अशा वेळी त्याचे हे अधिवासाशी जुळवून घेणे अभ्यासणे गरजेचे ठरते. ‘वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी’तर्फे ज्येष्ठ व्याघ्रतज्ज्ञ विद्या अत्रेय या प्रकल्प हाताळतील. यापूर्वी अकोले (जि. अहमदनगर) येथे २००९ मध्ये असा अभ्यास करण्यात आला होता. राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ाबाबत अनेक अभ्यास झाले आहे, मात्र ‘जीपीएस-जीएसएम कॉलर’च्या माध्यमातून होणारा अभ्यास प्रथमच होत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

हा विशेष अभ्यास वन विभाग आणि वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी, इंडिया असा संयुक्तपणे होईल. या अभ्यासास जुलैमध्ये केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर प्रकल्पाची तयारी सुरू करण्यात आली.  वन विभाग आणि वाइल्ड लाइफ कॉन्झवर्शेन सोसायटी, इंडिया यांच्याकडून संयुक्तपणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. बिबटय़ाला लावलेल्या कॉलरमुळे त्याच्या प्रत्येक तासाची हालचाल समजू शकेल. तीन महिन्यांपूर्वी अंधेरी येथे मरोळ एमआयडीसीत बिबटय़ाने वास्तव्य केल्याची घटना घडली होती. अशा घटनांमध्ये या अभ्यासाचा मोठा फायदा होऊ शकतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard collar help to get data dd
First published on: 27-11-2020 at 01:54 IST