पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली असतानाच कमी पावसामुळे या वेळी मुंबईकरांना खड्डय़ांमधून मार्ग काढण्याची वेळ आलेली नाही. उत्तम रस्ते केल्याचा पालिकेचा दावा जूनच्या पहिल्याच पावसात धुऊन निघाला होता, मात्र त्यानंतर एकदाही मोठा पाऊस झाला नसल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांची नोंद कमी दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत जून ते सप्टेंबर या महिन्यात तब्बल दोन हजार मिमीहून अधिक पाऊस पडतो. या पावसात टिकणारे रस्ते बनवण्यासाठी पालिका दरवर्षी वेगळे प्रयोग आजमावत असली तरी गेल्या वर्षीचे निवडणूक वर्ष वगळता त्यात फारसे यश आले नव्हते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी खड्डय़ांवरून पालिकेच्या सभागृहात रणकंदन होत असे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला युद्धपातळीवर काम हाती घ्यावे लागत असे. या वेळी मात्र खड्डय़ांविरोधातील आवाज फार मोठा नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही हायसे वाटले आहे.

याचा अर्थ मुंबईतील रस्त्यांवर बिलकूल खड्डे पडले नाहीत, असा होत नाही. १९ जूनला मुंबई बंद करणाऱ्या पावसानंतर मुंबईतील खड्डय़ांची संख्या अचानक वाढली होती. जून अखेपर्यंत मुंबईत १३६६ खड्डय़ांची नोंद झाली. यातील बहुतांश खड्डे १९ जूननंतरचे होते. त्यानंतर पावसानेच माघार घेतली. मात्र तरीही जुलअखेर खड्डय़ांची संख्या अडीच हजारांवर व आता ४१५९वर पोहोचली आहे. जुल व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांत तुरळक सरी असतानाही या दोन महिन्यांत २८०० खड्डे वाढले.

खड्डे नोंद करण्याच्या पालिकेच्या या यंत्रणेत त्रुटी असल्या तरी त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीचा साधारण अंदाज येतो. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वेळी खड्डय़ांची संख्या खूप कमी झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत तिप्पट खड्डय़ांची नोंद झाली होती. २०१३ मध्ये तर खड्डय़ांनी उच्चांक नोंदवला होता. त्या तुलनेत या वेळी खड्डे कमी असले तरी त्याचे श्रेय पालिकेच्या रस्तेकामापेक्षा कमी पावसाला द्यावे लागेल.

एक जून ते २ सप्टेंबरमधील खड्डे – पाऊस

२०१५     ४१५९      १६२८ मिमी

२०१४    १२६०६     २१७२ मिमी

२०१३    ३२७०९     २२४३ मिमी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less rain on municipal on rule spot hoel decline in the number
First published on: 03-09-2015 at 04:37 IST