ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी आता जिल्हा परिषदेतील शिक्षकांना शिक्षणाचे धडे देणार आहेत. त्यासाठी सर्व जिल्ह्य़ांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जगातील सर्वोत्तम ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत. डिसले हे ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील १४३ हून अधिक देशांतील १४०० पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे. राज्यातील इतर शिक्षकांनाही डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्याचे ग्रामविकास विभागाने ठरविले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी या उपक्रमामधून आपल्या जिल्ह्य़ाचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून  डिसले यांनी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील सर्व शाळांनी शिक्षणविषयक नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lessons of disley guruji to teachers in zilla parishad schools abn
First published on: 11-02-2021 at 00:01 IST