चित्रपट क्षेत्रासाठी राज्य सरकारतर्फे दिले जाणारे सर्वोच्च पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांची तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता बासू चटर्जी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलु अभिनेत्री रिमा यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला आहे.
व्ही. शांताराम आणि राज कपूर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरूप आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी तीन लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरूप आहे.
रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
यापूर्वी जगदीश खेबुडकर, डॉ. जब्बार पटेल, दिलीप प्रभावळकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला असून मनोज कुमार, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल हे राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आतापर्यंत महेश कोठारे, स्मिता तळवलकर, लीला गांधी तसेच आशुतोष गोवारीकर, शबाना आझमी, माधुरी दीक्षित यांना देण्यात आला  आहे.