‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरांमधील घुसखोरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पात्र रहिवाशांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. घुसखोरांच्या संख्येबाबतही नेमकी माहिती उपलब्ध व्हावी यादृष्टीने काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत संक्रमण शिबिरांत किती घुसखोर आहेत, हे स्पष्ट होईल, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी मोहन ठोंबरे यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५५० घुसखोरांना बाहेर काढण्याची कारवाई झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत ‘म्हाडा’ची ५० हून अधिक ठिकाणी संक्रमण शिबिरे असून त्यात सुमारे २० हजार कुटुंब राहतात. ‘म्हाडा’ने काही वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीप्रमाणे त्यात सुमारे आठ हजार घुसखोर आहेत. मात्र, पात्र रहिवाशांची यादी तयार करण्यासाठी ‘म्हाडा’ने राबवलेल्या मोहिमेत सुमारे साडेसात ते आठ हजारच अर्ज आले. त्यामुळे संक्रमण शिबिरांत सुमारे १२ हजार घुसखोर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
‘म्हाडा’ने संक्रमण शिबिरांत हलवलेल्या मूळ रहिवाशांच्या अर्जाची छाननी करून पात्र रहिवाशांची बृहदसूची (मास्टर लिस्ट) निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. मार्चमध्ये १०१७ जणांची पहिली यादी जाहीर झाली. पण संपूर्ण यादी आणि घुसखोर किती हे नेमके कधी समोर येणार याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यादृष्टीने काम सुरू आहे. तीन महिन्यांत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी अधिकृत रहिवाशांच्या यादीच्या फाइल गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे या कामात अडचणी येत आहेत. प्राधिकरणाचे अधिकारीही या प्रकरणात दोषी आहेत. दोषींवर कारवाईही करण्यात येईल. अंतिम यादी तयार होईपर्यंत क्रमाक्रमाने खातरजमा झालेल्या ठिकाणी घुसखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५५० घुसखोरांना बाहेर काढण्यात आल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले.