सरकार ‘अच्छे दिना’च्या जुमल्यावर निवडून आले असले तरी अजूनही प्रत्यक्षात ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते बुधवारी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. अच्छे दिनाच्या चुनावी जुमल्यांच्या बळावर अनेकांनी सत्तेचे इमले बांधले. देशात सगळं काही ‘अच्छे दिना’च्या आशेवर सुरू आहे. मात्र, सध्या लोक जिवंत आहेत, हेच ‘अच्छे दिन’ म्हणावे लागतील, असा उपाहासात्मक टोला उद्धव यांनी भाजपला लगावला. यावेळी उद्धव यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोषणांचेही वाभाडे काढले. नोटाबंदीच्या निर्णयाला सगळ्यांचा पाठिंबा आहे, असे दाखवले जात आहे. मात्र, हा निर्णय फसला असेल तर ते खुलेपणाने मान्य करावे. नोटाबंदी म्हणजे भूल न देता केलेली शस्त्रक्रिया आहे. निर्णय घेतल्यानंतर ही चूक सरकारच्या लक्षात आली. त्यामुळे आता सरकारकडून जुन्याच योजनांची घोषणा करून जनतेला पुन्हा भूल देण्याचा प्रयत्न होत असल्याचे उद्धव यांनी म्हटले. यावेळी उद्धव यांनी निवडणुकांपूर्वी अर्थसंकल्प जाहीर करण्याच्या केंद्राच्या निर्णयालाही विरोध दर्शविला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर आकर्षक योजनांची घोषणा करून फायदा मिळविण्याचा  प्रयत्न केला जाऊ शकतो. भाजप निवडणुकीच्या रिंगणात आहे, तोपर्यंत त्यांना आचारसंहिता बंधनकारक आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून घोषणाबाजी करणे आचारसंहितेचा भंग ठरेल, असे उद्धव यांनी म्हटले.

दरम्यान, उद्धव यांनी राज्यातील आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाचार होऊन युती करणार नाही, असा इशाराही यावेळी भाजपला दिला. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे अस्तित्त्व संपविण्याचे मनसुबे आखले जात होते. मात्र, आमचे अस्तित्त्व संपवायचे असेल तर दोन हात करण्यासाठी मैदानात उतरा. कटकारस्थान करू नका, असे उद्धव यांनी म्हटले. याशिवाय, स्थानिक निवडणुकांमध्ये जिंकणे महत्त्वाचे असेल तर जिंकलेच पाहिजे. स्थानिक पातळीवरील निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडण्याची भाजपची भूमिका असेल तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्यास पक्षाचे चिन्ह सोडून लढू नका, असे उद्धव यांनी म्हटले.