|| नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : टाळेबंदीमुळे भौतिक जग थांबले असताना वैचारिक जगाला अधिक गती देण्याची प्रक्रिया ‘भिलार’ या पुस्तकांच्या गावात अखंड सुरू होती. मार्च ते ऑक्टोबर २०२० या टाळेबंदीच्या काळात भिलार आणि पंचक्रोशीतील ३०० ते ३५० वाचकांनी १ हजार ५०० पुस्तकांचा वाचनानंद घेतला. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ५ ते ७ हजार पर्यटकांनी प्रकल्प कार्यालयाला भेट दिली.

२०१७ साली राज्य शासनाचा ‘मराठी भाषा विभाग’ आणि ‘राज्य मराठी विकास संस्था’ यांच्या प्रयत्नांतून ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प आकाराला आला. भिलार गावातील घरे, शाळा, मंदिरे, इत्यादी ठिकाणी विविध प्रकारची मराठी पुस्तके  ठेवली आहेत. प्रत्येक दालनात ८०० ते १००० पुस्तके  याप्रमाणे एकूण ३० हजार पुस्तकांचे हे गाव आहे.  वाचकांना पुस्तके  चाळता येतील आणि आरामात बसून वाचता येतील अशी व्यवस्था येथे आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या घरांतील १५० ते ५०० चौरस फू ट जागा वाचनसेवेसाठी विनामोबदला दिली आहे. तेथे येणाऱ्या पर्यटक-वाचकांच्या निवासाची, नाश्ता आणि जेवणाची सोय करता येत असल्याने रोजगारनिर्मिती झाली आहे. ‘टाळेबंदीमुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला; पण त्यापूर्वी पर्यटनासाठी आलेल्या आणि टाळेबंदीमुळे अडकू न पडलेल्या पर्यटकांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. विरंगुळ्यासाठी दुसरे काहीच साधन उपलब्ध नसल्याने स्थानिकांचीही पावले पुस्तक दालनांकडे वळली. दालनात पुस्तकाची नोंद करून ते घरी घेऊन जाण्याचीही मुभा आहे,’ असे विनोदी साहित्याचे दालन चालवणारे संतोष सावंत यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळात त्यांच्या दालनाला साधारण १५० वाचकांनी भेट दिली.

पूर्वी गावातील ठरावीकच लोक पुस्तके  वाचत; पण प्रकल्पामुळे इतरांनाही वाचनाची सवय लागल्याचे त्यांनी सांगितले. गावातील मंदिरांजवळ ५० साहित्यिकांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. मे २०१७ ते मार्च २०२० पर्यंत सुमारे तीन लाख पर्यटक-वाचकांनी भिलारला भेट दिली. टाळेबंदीमुळे शाळांच्या सहली सध्या भिलारमध्ये येत नाहीत. पण टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर इतर पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown marathi language department state marathi vikas sanstha book village project akp
First published on: 07-02-2021 at 00:14 IST