गरजूंशी संपर्क होणे अशक्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, टाळेबंदीमुळे बंद पडलेले उद्योगधंदे, झालेले स्थलांतर असे विदारक चित्र सध्या देशभरात आहे. याचे दूरगामी परिणाम तळागाळातल्या जनतेच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर, शिक्षणावर होणार आहेत. या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी खरे तर स्वयंसेवी संस्थांनी मोठय़ा प्रमाणावर कार्यरत राहण्याची गरज आहे. मात्र, टाळेबंदीने या संस्थांच्या कार्याला बऱ्याच मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे टाळेबंदीनंतर पुन्हा शून्यापासून सुरुवात करत वंचित आणि गरजू समाजाचे आयुष्य स्थिरस्थावर करण्याचे मोठे आव्हान स्वयंसेवी संस्थांना पेलावे लागणार आहे.

वंचित कु टुंबांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘डोअरस्टेप स्कू ल’ ही संस्था शैक्षणिक पूल तयार करते. मुलांच्या वयानुसार त्यांना सरकारी शाळेत दाखल के ले जाते व तत्पूर्वी त्यांना आवश्यक ते शिक्षण-प्रशिक्षण पुरवले जाते. मात्र, सध्या उद्योगधंदे बंद पडल्याने गरीब कु टुंबांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आहे. अशा वेळी त्यांना शिक्षणाचे महत्त्व कसे पटवून द्यायचे, हा प्रश्न संस्थेसमोर आहे. त्यामुळे शिक्षणाचे कार्य बाजूला ठेवून गरिबांना शिधावाटप करण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे. शिवाय स्थलांतर झालेल्या कु टुंबांतील मुले पुन्हा शाळेत न परतण्याची भीती आहे. सध्या मुंबई-पुण्यातील १ लाख विद्यार्थी डोअरस्टेप स्कू लशी जोडले गेले आहेत. टाळेबंदीमुळे शिक्षणात खंड पडल्याने विद्यार्थी शिकवलेला अभ्यासही विसरून जातील. त्यांचे शैक्षणिक आयुष्य काही वर्षे मागे जाईल. टाळेबंदीमुळे आपले शैक्षणिक कार्य पुन्हा उभे करण्यासाठी मुलांना शिक्षणाची गोडी लावणे हे संस्थेसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे संस्थेच्या संचालिका बिना शेख लष्करी सांगतात.

कर्क रोग, एचआयव्ही अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त लहान मुलांची इच्छा पूर्ण करण्याचे कार्य ‘मेक अ विश’ ही संस्था करते. सध्या दोन हजार मुलांच्या इच्छांची यादी या संस्थेकडे आहे. मात्र, टाळेबंदीमुळे बाहेर पडून काम करणे शक्य नाही.  हे काम करताना संस्थेला सतत रुग्णालयांच्या संपर्कोत राहावे लागते. सध्या रुग्णालयांत प्रवेश मिळत नसल्याने लहान मुले आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटता येत नसल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक भाटिया सांगतात.

फिरत्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वृद्धांना औषधोपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, इत्यादी वैद्यकीय सुविधा ‘हेल्पएज इंडिया’ पुरवते. सध्याच्या स्थितीत वृद्धांच्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. ४० टक्के  वृद्ध एकटे राहतात. ते सध्या तणावाखाली असल्याने त्यांना समुपदेशनाची गरज आहे. परंतु, टाळेबंदीमुळे वृद्धांपर्यंत पोहोचता येत नसल्याचे, संस्थेचे संचालक प्रकाश बोरगावकर सांगतात. गरज असल्यास १८००१८०१२५३ या क्रमांकावर संपर्क  साधण्याचे आवाहन त्यांनी के ले. सध्या ते वृद्धांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lockdown stopped social work zws
First published on: 10-06-2020 at 02:00 IST