या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’चा अभिनव ‘अभिजात’ उपक्रम २८ रोजी ठाण्यात

मुंबई : कविता जगण्याची प्रेरणा देते, जगण्याचे निमित्त देते आणि जगणे अधिक संपन्नही करते. ज्या रसिकाला कवितेचे वेड लागते, तो तिच्यामध्ये आकंठ बुडून जातो आणि कवितामयच होऊन जातो. असा अनुभव घेण्याची संधी येत्या २८ फेब्रुवारी रोजी ठाण्यात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘अभिजात’ या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात मिळू शकेल.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाचे पहिले सत्र ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे. कवितेच्या या मंचावर स्वत:ची कविता सादर करण्यासाठी नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, प्रतीक्षा लोणकर यांच्यासारखी लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे एकत्र येणार आहेत. त्यांच्या बरोबरीनेच अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी हे ज्येष्ठ कवीही या मंचावर उपस्थित राहून कविता सादर करणार आहेत.

कविवर्य बा. भ. बोरकरांना, म्हणजे बाकीबाब यांना, तर शब्द म्हणजे शारदेच्या झुंबराचे लोलक वाटतात. ते म्हणतात..

शारदेच्या झुंबराचे

शब्द अद्भुत लोलक

अंत: प्रकाशी डोलता

त्यात आंदोळे त्रिलोक

स्नेहे खेळतां त्यांच्यांशी

चित्त त्यांच्यावर जडे

असे अलौकिकाचे लेणे असलेल्या कविता हेच तर रसिकांचे सुखनिधान असते. कवीच्या अंतर्मनात डोकावणाऱ्या अशा कविता ऐकण्याची संधी २८ फेब्रुवारी रोजी ठाण्यात ‘लोकसत्ता’च्या अभिजात कार्यक्रमामुळे मिळणार आहे.

‘लोकसत्ता’चा हा ‘अभिजात’ उपक्रम म्हणजे मराठी भाषेचे सौष्ठव वाढवणाऱ्या कवितांचा जागर आहे. रसिकांसाठी ती एक लक्षात राहणारी खूणच असेल.

या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशमूल्य नसले, तरीही त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी उपलब्ध होणार आहेत.

 

प्रायोजक

‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी आणि मँगो हॉलिडेज आणि रुणवाल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta abhinav abhijat upkram thane akp
First published on: 25-02-2020 at 02:30 IST