अर्थसंकल्प जाणून घ्या सहजपणे

अर्थसंकल्पाच्या यशापयशाचे तज्ज्ञांकडून विश्लेषण

उद्योगधुरीणांची फळी सज्ज; अर्थसंकल्पाच्या यशापयशाचे तज्ज्ञांकडून विश्लेषण

आजवरच्या परंपरेपेक्षा एक महिना आधी म्हणजे बुधवार, १ फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्र न राखता यंदा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या एकूण संकल्पाचा तो एक घटक असेल. यावेळच्या अर्थसंकल्पाचे हेच केवळ वैशिष्टय़ म्हणावे काय? देशाचा अर्थप्रपंच आणि जनसामान्यांचा संसार नेटका करू पाहणाऱ्या या संकल्पाला निश्चितच अनेक पैलू आणि कंगोरे आहेत. त्यांचे महत्त्व आणि नेमका अर्थ उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ यंदाही पार पाडणार आहे. त्यासाठी यंदाही तज्ज्ञ अभ्यासक, विश्लेषक, उद्योगधुरीणांची फळी सज्ज केली गेली आहे.

वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी नेमकी केव्हापासून होईल हे अनिश्चित आहे आणि एकूण कर संकलनाचा तपशीलच नसल्याने, खर्चाविषयक प्रयोजनाची त्यांच्यापुढे अडचण असल्याचे म्हटले जात आहे. ‘लोकसत्ता अर्थसंकल्प’ विशेषांकात या आव्हानांबाबत अर्थमंत्र्यांनी साधलेल्या कसरतीचा तज्ज्ञ वेध घेतील.

अर्थव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या तज्ज्ञ मान्यवरांमध्ये आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जचे अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, केअर रेटिंग्जचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश मोकाशी, कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचा वेध खासदार राजू शेट्टी घेतील. राजकीय-आर्थिक अंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे अर्थसंकल्पाच्या यशापयशाचे विश्लेषण करतील. आरोग्यनिगा क्षेत्राबाबत अर्थसंकल्पाचा कल कसा राहिला हे यान्सेन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव नवांगुळ स्पष्ट करतील. भांडवली बाजार आणि वित्त क्षेत्रातील अर्थसंकल्पातील पडसादाचे वेध एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे आणि प्रभूदास लीलाधरचे मुख्याधिकारी अजय बोडके हे घेतील. जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा किरण मोघे या अर्थसंकल्पात महिला आणि सामाजिक क्षेत्राची कितपत दखल घेतली गेली हे स्पष्ट करतील. करविषयक उलटफेरींचा वेध व्यय लेखापाल आशीष थत्ते हे घेतील.

अर्थसंकल्पदिनी परिसंवाद

‘अर्थसंकल्प समजून घ्या सहजपणे’ असा खास अर्थसंकल्पावरील चर्चेचा उपक्रमही बुधवारी अर्थसंकल्पदिनीच योजण्यात आला आहे. आर्थिक विश्लेषक जयराज साळगावकर, सर्वाच्या दृष्टीने कळीच्या असलेल्या प्राप्तिकर तरतुदीसंबंधाने सनदी लेखाकार प्रवीण देशपांडे आणि शेअर गुंतवणूक जाणकार अजय वाळिंबे यांचा या परिसंवादात सहभाग असेल.

नोकरदारांची करांच्या जाचातून सुटका?

निश्चलनीकरणाने साधलेली उलथापालथ व अर्थ जीवनावरील घाव ताजे असताना, अर्थसंकल्पाकडून त्या संबंधाने दिलासा मिळण्याची आशा केली जात आहे. खिशाला कात्री लावणाऱ्या करांच्या जाचातून नोकरदार, मध्यमवर्गीयांना काहीशी सुटका मिळेल, असे विश्लेषक खात्रीने म्हणतही आहेत. तर मग याच न्यायाने नोटाबंदीतून सर्वाधिक जाच सोसाव्या लागलेल्या कृषीक्षेत्र, बांधकाम क्षेत्र, लघुउद्योग यांच्या पदरीही घोषणांचे माप पडणे अपेक्षित आहे. मात्र करकपात अथवा कल्याणकारी घोषणा करण्यासाठी  पैशाची तरतूद कशी करणार, असा अर्थमंत्र्यांपुढे यंदा अभूतपूर्व पेच असेल.

अर्थसंकल्प २०१७-१८

  • ’ संकल्पाचे अनेक कंगोरे उलगडणार
  • ’ विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञांचा सहभाग
  • ’ विविध क्षेत्रांच्या पदरात काय पडणार याचाही उहापोह

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta budget

ताज्या बातम्या