‘करोना’ आणि टाळेबंदी सर्वासाठीच चिंतेचे सावट घेऊन आली. त्यातही छोटय़ा उद्योगांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या- विशेषत: स्त्रियांपुढे या काळात मोठाच आर्थिक पेच निर्माण झाला. या काळात काही जणींनी पुढाकार घेत टाळेबंदीतल्या अडचणींमध्येही संधी शोधली. अशा तीन कर्तबगार महिला उद्योजकांच्या यशाचे गमक बुधवारी ‘लोकसत्ता-चतुरंग चर्चा’ या उपक्रमातून जाणून घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या बुधवार ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘मंदी एक संधी’ या ‘वेब संवादा’चे आयोजन करण्यात आले आहे. बचत गटातील १०० स्त्रियांना ‘करोना’ काळात भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या सुवर्णा गोखले, मुखपट्टी व हातमोज्यांचे महत्त्वाचे उत्पादक असलेल्या ‘पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि.’च्या व्यवस्थापकीय संचालक स्नेहल लोंढे आणि मुंबईत दुचाकी चालवायला शिकवण्याच्या व्यवसायामधून खाद्यपदार्थ घरपोच पुरवण्याचा नवा व्यवसाय टाळेबंदी काळात सुरू करणाऱ्या युवा उद्योजिका अमृता माने यांच्याशी या वेबसंवादात गप्पा होणार आहेत.

पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या कार्यकर्त्यां सुवर्णा गोखले यांनी या काळात त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर बचत गटातील महिलांचे प्रश्न जाणून घेतले आणि टाळेबंदीच्या सुरुवातीला ठप्प झालेल्या त्यांच्या व्यवसायावर तोडगा काढला.

मुखपट्टी आणि हातमोजे ही आता नित्याच्या वापराची गोष्ट झालेली असताना अनेकांनी त्यांचे उत्पादन सुरू केले. कवठे महांकाळ येथील स्नेहल लोंढे यांनी केवळ या वस्तूंमध्ये वैविध्यच आणले नाही, तर या कालावधीत पूर्वीपेक्षा दुपटीने अधिक- म्हणजे जवळपास ६०० स्त्रियांना रोजगार मिळवून दिला. संपूर्ण कुटुंबाला वापरता येण्याजोग्या मुखपट्टी आणि हातमोजांच्या किट्सपासून नावीन्यपूर्ण मुखपटय़ांपर्यंतची बनवली जाणारी उत्पादने आणि त्यातून या उद्योगाने मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे.

‘वुमन ऑन व्हील्स’ ही महिलांना दुचाकी चालवण्यास शिकवणारी संस्था सुरू करून यशस्वी व्यवसाय करून दाखवणाऱ्या अमृता माने यांनी टाळेबंदीतील संधी जाणली. त्यांनी या काळात ‘डिलिव्हरी बॉय’प्रमाणे ‘डिलिव्हरी गर्ल’ ही संकल्पना राबवली आणि स्वत:ची दुचाकी असणाऱ्या मुली आणि महिलांना खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याच्या माध्यमातून अर्थार्जनाचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला.

सहभागी होण्यासाठी  https//tiny.cc/LS_ChaturangCharcha_30Sep  येथे नोंदणी आवश्यक.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang charcha on wednesday with three dutiful women entrepreneurs abn
First published on: 26-09-2020 at 00:19 IST