२०१३ सरले.. २०१४ सुरूही झाले. भिंतीवरचे कॅलेंडर बदलले, पण आधीच्या कॅलेंडर वर्षांत घडलेल्या घटना बदलणे वा पुसणे कधीही शक्य नसते. गेल्या वर्षी, २०१३मध्ये जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटना बदलल्या, राजकीय सत्तांतरे झाली, भीषण स्फोटांच्या मालिकांमध्ये अनेक जणांना जीव गमवावे लागले, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रांत अनेकांचा अस्त झाला तसाच अनेकांच्या उदयाची ती नांदीही ठरली.
धर्मगुरू बदलले, धर्मस्थळांच्या भूमिका बदलल्या, धार्मिक तणावाचे प्रसंगही उद्भवलेले आपण पाहिले. या सगळ्या
क्षणांचे वृत्तपत्रीय वाचनाद्वारे आपण अप्रत्यक्ष साक्षीदारही ठरलो.
पण, उगवत्या प्रत्येक नव्या दिवसाबरोबर त्या प्रसंगांचे विस्मरणही होत जाते. या अशा घटना, करार, धोरणे, निर्णय आणि क्षण नोंदरूपात साठवून ठेवता आले तर?.. हाच धागा पकडून ‘लोकसत्ता’ने गतवर्षीच्या घटनांचा ‘वेध’ घेणारा ‘वर्षवेध’ हा वार्षिक अंक तयार केला आहे. सरलेल्या वर्षांवर मुद्रा उमटविणाऱ्या प्रसंगांच्या नोंदी असलेला हा वार्षिक अंक येत्या १७ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यापर्यंत सगळय़ांसाठी..
गतवर्षीच्या घडामोडींना उजाळा देणारा हा वार्षिक अंक खरे तर सर्वासाठीच उपयुक्त माहितीचा स्रोत आहे. मात्र, त्यातही शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांतील उमेदवार, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, सामान्यज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्यासाठी हा अंक म्हणजे २०१३ मधील प्रमुख घडामोडींचा संग्रह ठरणार आहे.
ठळक वैशिष्टय़े
*गेल्या वर्षांतील घडामोडींच्या तारीखनिहाय नोंदी
*२०११च्या जनगणनेतील उपयुक्त आकडेवारी
*महत्त्वाची सांख्यिकी माहिती
*‘लोकसत्ता’मध्ये संबंधित निवडक विषयांवर आलेल्या लेखांच्या वेबलिंक