मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव, अर्थात ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’ हा सोहळा शनिवारी (५ नोव्हेंबर) ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच मुंबईत शिवाजी पार्क येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’त झालेल्या या कार्यक्रमात या नऊ कर्तबगार ‘दुर्गा’चा सन्मान करण्यात आला. तसेच यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आला. स्त्रियांचा जीवनसंघर्ष, त्यांची संकटांवर मात करण्याची जिद्द आणि विधायक कार्यातून इतरांनाही प्रगतीच्या मार्गावर आणण्याचा त्यांचा ध्यास सांगणाऱ्या नऊ प्रेरणादायी कथा या कार्यक्रमातून समोर आल्या. या पुरस्कार वितरण सोहळय़ाचे शनिवारी दुपारी २ वाजता ‘एबीपी माझा’वर प्रक्षेपण होणार आहे.

यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’साठी निवड झालेल्या नऊ ‘दुर्गा’मध्ये सायबर गुन्हेविषयक जनजागृती करणाऱ्या सोनाली पाटणकर, उद्योजिका भूपाली निसळ, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या तपस्वी गोंधळी, सामाजिक कार्यकर्त्यां सीमा किणीकर, शास्त्रज्ञ डॉ. सुलभा कुलकर्णी, डॉ. मोनाली रहाळकर, डॉ. सुनीती धारवाडकर, संदीपा कानिटकर आणि अंध-अपंगांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यां जाई खामकर यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे हे नववे वर्ष आहे.

याच कार्यक्रमात गेल्या ७५ वर्षांतल्या हिंदी चित्रपटसंगीताचा आढावा घेणारा ‘अमृत सिनेमा’ हा कार्यक्रमही पाहायला मिळणार असून त्यात जय आजगांवकर, राजेश अय्यर, अपूर्वा पेंढारकर आणि सोनाली कर्णिक यांनी सुमधुर गीते सादर केली आहेत.

मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रायोजक  :‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ सिडको, ‘व्ही पी बेडेकर अँड सन्स प्रा. लि.,’ ‘तन्वी हर्बल्स,’ ‘टीजेएसबी सहकारी बँक लि’

पॉवर्ड बाय : ‘व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स’,‘दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड’, जमीन प्रा. लि.,

टेलिव्हिजन पार्टनर : ‘एबीपी माझा’