इंटरनेट व मोबाइलचे व्यसन जडलेली आजची तरुणाई व त्यामुळे दुरावलेली नाती यांचे चित्रण करत मोबाइल किंवा संगणकावरील बोटांच्या भाषेपेक्षा प्रत्यक्ष संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारी एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘बीईंग सेल्फिश’ ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरली. २० डिसेंबर रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़मंदिरात होणाऱ्या महाअंतिम फेरीत मुंबई विभागातून ही एकांकिका सादर होईल.
‘सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत’ आणि ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला ‘अस्तित्व’ या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ‘झी मराठी’ ही वाहिनी माध्यम प्रायोजक आहे. रविवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मुंबईची विभागीय अंतिम फेरी झाली. ‘बीईंग सेल्फिश’ने सवरेत्कृष्ट एकांकिकेसह सवरेत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनाच्या वैयक्तिक पारितोषिकांवरही आपले नाव कोरले. १० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे प्रथम पारितोषिकाचे स्वरूप आहे. ‘डझ नॉट एक्झिस्ट’ (कीर्ती महाविद्यालय) या एकांकिकेला दुसरा क्रमांक मिळाला, तर साठय़े महाविद्यालयाच्या ‘दस्तुरखुद्द’ला तिसरा क्रमांक मिळाला. याचबरोबर ‘ब्लॅक वॉटर’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय), ‘समांतर’ (महर्षी दयानंद महाविद्यालय), ‘एडीबीसी’ (मिठीबाई कला महाविद्यालय) या आणखी तीन एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या. मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी, लेखिका-समीक्षक शांता गोखले, नाटककार अशोक पाटोळे यांनी काम पाहिले, तर पारितोषिक वितरण सोहळ्यास राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना कमलाकर नाडकर्णी, शांता गोखले, अशोक पाटोळे, ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी, ‘इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे महाव्यवस्थापक महेश चव्हाण, पश्चिम विभागाचे वितरण प्रमुख मंगेश ठाकूर, लोकसत्ताचे वरिष्ठ सहायक संपादक रवींद्र पाथरे,  आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैयक्तिक पारितोषिके
सवरेत्कृष्ट नेपथ्य- हर्षद माने, विशाल नवाथे (बीईंग सेल्फिश)
सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना- जयदीप आपटे (बीईंग सेल्फिश)
सवरेत्कृष्ट संगीत- समीहन (बीईंग सेल्फिश)
सवरेत्कृष्ट अभिनय- सिद्धी कारखानीस (दस्तुरखुद्द), कुणाल शुक्ल (बीईंग सेल्फिश)
सवरेत्कृष्ट लेखक- तुषार जोशी (बीईंग सेल्फिश)
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- सुशील, कुणाल, पराग (बीईंग सेल्फिश)

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी २० तारखेला मुंबईत होणार आहे. या स्पर्धेला अस्तित्व संस्थेचे सहकार्य, तर झी मराठीचे इलेक्ट्रॉनिक प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या एकांकिकांची माहिती, या स्पर्धेतील परीक्षकांचा परिचय आणि स्पर्धेचा मूड टिपणारे विशेष पान- उद्या, मंगळवारच्या अंकात.

एम. एल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘बीईंग सेल्फिश’ ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरली. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika being selfish of mumbai in final
First published on: 15-12-2014 at 02:49 IST