गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता’ने ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना गौरवले. त्यांच्या योगदानाचा सत्कार केला. यंदाही वाचकांनी पाठवलेल्या माहितीमधून निवडक नऊ कर्तृत्ववान दुर्गाचा सत्कार मंगळवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात करण्यात येणार आहे. या सोहळ्यात संगीतमय  नजराणा पेश केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नर्मदा परिसरातील मुलांसाठी शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या भारती ठाकूर, मानवी तस्करी रोखणाऱ्या शर्मिष्ठा वालावलकर, प्राणिमैत्रीण सृष्टी सोनवणे, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नासरी चव्हाण, कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ. कल्पना जोशी, देवीचे गाव तुळजापूर स्वच्छ करण्याचा वसा घेतलेल्या भारतबाई देवकर त्याचप्रमाणे स्वत: अंध असूनही इतर अंधांना स्वयंपूर्ण बनवणाऱ्या राधा बोरडे, आदिवासींच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉ. सुजाता गोडा आणि स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या उद्योजिका अनुराधा देशपांडे या नऊ जणी या वर्षीच्या नवदुर्गा ठरल्या आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘व्हिम’ आणि ‘केसरी’ आहेत.

‘लोकसत्ता’तर्फे नवरात्रोत्सवात आयोजिलेल्या ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमातील या निवडक दुर्गाचा सत्कार नामवंतांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या या नऊ जणींचे आयुष्य स्फूर्तिदायक आहे.

संगीतमय सोहळा

संगीतमय सत्कार सोहळ्यात सोनिया परचुरे सहनृत्यांगनांसह नृत्य सादर करणार आहेत. तर अभिनेत्री कविता मेढेकर आणि प्रतीक्षा लोणकर अभिवाचन सादर करतील. मैत्री ढोलपथकाचे वादन आणि चित्रकार शुभांगी सामंत यांचे रेखाटन होणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ यांची आहे. प्रेक्षकांनी वेळेवर कार्यक्रमास उपस्थित राहावे कारण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश असून तुमची उपस्थिती या दुर्गाना नक्कीच प्रेरणादायी असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta navdurga honor ceremony
First published on: 22-10-2016 at 02:46 IST