‘आदरणीय व्यासपीठ, परीक्षक आणि श्रोतृगण..’ ‘लोकसत्ता वक्तृत्त्व स्पर्धे’च्या निमित्ताने महाराष्ट्रभर घुमणारे हे शब्द आज, रविवारी मुंबईत घुमणार आहेत. जनकल्याण सहकारी बँक, पुणे आणि तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स यांच्या सहकार्याने राज्यभरात होत असलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी सहा केंद्रांवर पार पडली असून आता रविवारी मुंबई आणि रत्नागिरी या दोन केंद्रांवरील प्राथमिक फेरी पार पडेल. उत्तमोत्तम वक्त्यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील आजच्या पिढीलाही आपले विचार मांडायचे असतात. अशा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकसत्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात ही स्पर्धा राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, ठाणे, अहमदनगर आणि रत्नागिरी या आठ केंद्रांवर होत आहे. मुंबई विभागातील प्राथमिक फेरी रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून एक्सप्रेस टॉवरमधील सभागृहात होणार आहे. या प्राथमिक फेरीतील उत्कृष्ट वक्त्यांची निवड मुंबईच्या विभागीय अंतिम फेरीत होईल.