देशातील औद्योगिकदृष्टय़ा प्रगत राज्यांमध्ये आघाडीचे स्थान असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे ही दोन प्रमुख शहरे आहेत. या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र ही वाढ नियोजनबद्ध नसून अस्ताव्यस्त आहे. यामुळे या दोन्ही शहरांतील रिअल इस्टेट व्यवसायाला प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पण या व्यवसायात कोणतीही सूसूत्रता नाही. हीच गोष्ट नेमकी लक्षात घेत ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह’चे आयोजन केले आहे. अल्हम्ब्रा, पॅलेडियम हॉटेल, लोअर परळ येथे ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून हे कॉनक्लेव्ह सुरू होणार आहे.
मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता भविष्यकाळात या शहरांमधील रिअल इस्टेट व्यवसायाला खूपच चांगले दिवस येणार आहेत. मात्र या व्यवसायापुढील आव्हानेही वाढणार आहेत. या आव्हानांचा आणि या व्यवसायाकडून असलेल्या अपेक्षांचा परामर्श घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने या कॉनक्लेव्हचे आयोजन केले आहे. या कॉनक्लेव्हमध्ये ‘मेकिंग मुंबई अॅण्ड ठाणे बेटर सिटीज’ या विषयावर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे. सरकारमधील प्रतिनिधी, अधिकारी, मुंबई – ठाणे पालिका, एमएमआरडीए अशा संस्थांचे प्रतिनिधी, बँकर्स आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
चर्चेमध्ये टाउनशिप्स व इमारतींचे आराखडाबद्ध नियोजन, एकमेकांशी जोडलेले रस्ते, परिणामकारक देखभाल, शहरात हरितपट्टे, बगिचे, नैसर्गिक आपत्तीपासून बचावाच्या उपाययोजना, बँक आणि वित्त पुरवठा याबाबत येणाऱ्या अडचणी, सुरक्षा आणि सुव्यवस्था याबाबतचे उपाय या सर्व मुद्दय़ांचा समावेश असेल. या चर्चेचे सविस्तर वृत्तांकन एक्स्प्रेस वृत्तसमुहाच्या ‘लोकसत्ता’, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘द फायनॅन्शिअल एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांमध्ये केले जाईल. या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2014 रोजी प्रकाशित
‘लोकसत्ता’ची रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह
देशातील औद्योगिकदृष्टय़ा प्रगत राज्यांमध्ये आघाडीचे स्थान असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे ही दोन प्रमुख शहरे आहेत.

First published on: 02-05-2014 at 02:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta real estate conclave