मुंबई : ‘एआय’, ‘चॅट-जीपीटी’-‘डीपसिक’च्या कोलाहलातही अचूक माहितीचे मूल्य पुढील काळात राहणार. गेल्या दहा वर्षांत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाटाड्या ठरलेला, जगातील महत्त्वाच्या घटनांचे कुतूहल असणाऱ्यांना उपयुक्त ठरणारा ‘लोकसत्ता – वर्षवेध’चा अंक उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. २०२४ सालात घडलेल्या घटना, या वर्षाचे खास मानकरी असा भरगच्च वाचनानंद देणारा मजकूर या अंकात वाचायला मिळेल.

लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो. पहिल्या वर्षापासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे पुनर्मुद्रण केले जाते. यंदा पूर्णपणे नव्या स्वरूपात हा वाचकांच्या हाती येईल. आंतरराष्ट्रीय घडामोडींइतक्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील महत्त्वपूर्ण घटना यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. अर्थ, शेती, हवामान, मनोरंजन, क्रीडा आदी विविध विषयांतील निवडक दहा घटनांचे विश्लेषण यात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षाचे मानकरी…

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आलेले देवेंद्र फडणवीस, पर्यावरणाच्या कामासाठी जागतिक सन्मान मिळविणारे माधव गाडगीळ, बुद्धिबळात लहान वयात जगज्जेता बनलेला गुकेश, जागतिक चित्रपट विश्व गाजवणारी भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडिया यांची दखल घेणारे मान्यवरांचे लेख हे यंदाच्या ‘वर्षवेध’चे खास आकर्षण आहे.