मुंबई : पीडीत, शोषित व वंचितांसाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी बरीच साहित्यसंपदा निर्मितीही केली. त्यांनी आयुष्यभर केलेले मोठे संस्थात्मक कार्य पाहता, ते  केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठच होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियातील मॉस्को येथील ‘मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ च्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे अनावरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अमित गोरखे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे मॉस्कोमध्ये अनावरण करण्याची संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. अण्णा भाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी आयुष्यभर कार्य केले. सामाजिक परिस्थितींमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण मोठी साहित्यनिर्मितीही केली. एकही दिवस शाळेत न गेलेल्या किंवा पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएच. डी करीत आहेत. मॉस्को राज्य ग्रंथालयाच्या या उपक्रमात मुंबई विद्यापीठाने सहभाग घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामान्य माणसाला जगण्याची ताकद व प्रेरणा मिळते. ‘फकिरा’तून अनेक कथा त्यांनी पुढे समाजापुढे आणल्या. त्यांनी अनेक संघर्षशील व्यक्तिमत्त्वे जगापुढे आणली. त्यांनी रशियाचा दौरा करून रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियातील क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्मृती आज याठिकाणी उभ्या राहत आहेत. हा त्यांच्या कार्याचा व मराठी जनांचा मोठा गौरव आहे, असे फडणवीस म्हणाले.

रशियातील भारतीय नागरिकांशी संवाद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रशियातील भारतीय नागरिकांशी मंगळवारी रात्री एका कार्यक्रमात संवाद साधला. रशियन उद्योग जगत आणि भारतीय दूतावासातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. रशिया हा नेहमीच भारताचा चांगला मित्र राहिला आहे. व्यापार असो की संस्कृती, सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये आणि नागरिकांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत उत्तम प्रगती करीत असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी झेप घेत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंध, निर्यात धोरण, बंदरविकास, पर्यटन अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तरांचेही सत्र झाले.

तैलचित्राचे रशियातील भारतीय दूतावासात अनावरण

मॉस्को (रशिया)  : कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन हलाखीचे असतानाही त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मॉस्को येथे केले. मॉस्कोतील भारतीय दूतावासातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण फडणवीस यांनी केले. यावेळी बोलताना  फडणवीस म्हणाले की, अण्णा भाऊंची लेखणी इतरांना प्रेरणा देणारी होती. त्यांच्या लेखणीने परिवर्तन,  समाजाला धीर देण्याचे आणि  लढण्याचे बळ दिले. रशिया प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन खऱ्या अर्थाने यथार्थ होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokshahir anna bhau sathe statue unveil in moscow zws
First published on: 15-09-2022 at 04:18 IST