ठाणे शहरात राहणाऱ्या एका १७ वर्षिय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी रविवारी तिच्या प्रियकरास अटक केली आहे. या मुलीच्या गर्भाशयाच्या पिशवीला दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नितीन मारूती मुसाडकर उर्फ बंटी (२३), असे यातील अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव असून तो मुंबई येथील लोअर परेल भागात राहतो. त्याचे गेल्या दोन वर्षांपासून ठाणे शहरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते.
या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्रास वाढू लागल्याने तिला मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
तेथे चार दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या मुलीच्या गुप्त भागामध्ये टोकदार वस्तू घातल्याने गर्भाशय पिशवीला दुखापत झाली, त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची बाब तिच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. डी. मोरे यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, ७ डिसेंबर २०१२ रोजी नितीन तिला मोटारसायकलवरून नालासोपारा येथे फिरायला घेऊन गेला होता, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, त्याला ताब्यात घेतले असता, त्याने या गुन्ह्य़ाची कबुली दिली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही मोरे यांनी दिली.