मुंबई : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार असून ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ  येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वार, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्या इथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. तसेच हे चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे. बुधवारी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन मात्र आपणा सर्वांस साध्या डोळ्यांनी घेता येणार आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lunar eclipse on wednesday akp
First published on: 23-05-2021 at 01:41 IST