८४ विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला; महाविद्यालय सर्वोच्च न्यायालयात जाणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी संस्थांमधील एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांवरील प्रवेशप्रक्रियेला वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सुरुवात केली असली तरी संचालनालयाने जागावाटप केलेल्या विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यास पुण्याच्या एम. ए. रंगूनवाला महाविद्यालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट करत हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे, त्यामुळे या महाविद्यालयात जागावाटप झालेल्या ८४ विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सुरुवातीला राज्य सरकारच्या अखत्यारीतील संचालनालयाने प्रवेश करण्यावरून आणि नंतर ८५ टक्के जागांवर परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी करण्यावरून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया बाधित झाली होती. आता उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात संचालनालयाला ८५ टक्के जागा राज्यातीलच विद्यार्थ्यांमधून भरण्याची मुभा देत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार १९ सप्टेंबरला संचालनालयाने खासगी महाविद्यालयांकरिता प्रवेशाची पहिली जागावाटप यादी जाहीर केली; परंतु न्यायालयाचे आदेश येऊनही पुण्याच्या रंगूनवाला महाविद्यालयाने संचालनालयाने पाठविलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. इतर खासगी महाविद्यालयांमध्ये मात्र ९० टक्के प्रवेश २२ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत झाले होते, अशी माहिती संचालनालयातील सूत्रांनी दिली.

खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नसल्याचे स्पष्ट करत रंगूनवाला महाविद्यालय सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. या संबंधात गुरुवारी अपेक्षित असलेली सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे येथील प्रवेशोच्छुक ८५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश न घेताच हात हलवीत परत यावे लागले. ३१ सप्टेंबर ही वैद्यकीय प्रवेश आटोपती घेण्याची शेवटची मुदत आहे. १९ सप्टेंबरला खासगी महाविद्यालयांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अवघे दोन दिवस मिळाले आहेत. त्यात हा तिढा उभा राहिल्याने त्यांच्या मनस्तापात भरच पडली आहे. पहिल्या यादीचे प्रवेश घेण्याकरिता २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती.

दरम्यान संचालनालयातर्फे दुसरी प्रवेश यादी २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहेत. त्यानंतर राहणाऱ्या रिक्त जागांची माहिती २६ सप्टेंबरलाच सायंकाळी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर संस्था स्तरावर रिक्त जागा भरण्याची मुभा दिली जाणार आहे.

एमबीबीएसच्या ३०० जागा कमी

महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या १७०० च्या आसपास जागा होत्या. मात्र, यंदा धुळ्यातील एसीपीएम, तळेगाव-दाभाडय़ातील एमआयएमईआर आणि साताऱ्याचे आयएमएसआर या खासगी महाविद्यालयांना प्रवेश करू देण्यास ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ने मनाई केली आहे. साताऱ्यातील महाविद्यालयाला तर गेली दोन वर्षे प्रवेशाला मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे, एमबीबीएसच्या तीन खासगी महाविद्यालयातील प्रत्येकी १०० याप्रमाणे ३०० जागा कमी झाल्या आहेत.

वसतिगृहाची सक्ती

काही वैद्यकीय महाविद्यालये शैक्षणिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांवर वसतिगृहातही प्रवेश घ्यावा आणि त्यासाठीचे हजारो रुपयांचे शुल्क भरण्याची सक्ती करीत आहेत. वसतिगृह शुल्क न भरल्यास प्रवेश देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका काही महाविद्यालयांनी घेतल्याने काही पालकांनी संचालनालयाकडे तक्रार केली आहे.

संचालनालयाकडे असलेली खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि जागा :

  • एमबीबीएस (१४) – १४१८
  • बीडीएस (२४) – १८६९