मुंबई : सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळत असल्याच्या चित्रफितीवरून अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नाराजी, तर पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका यातून कोकाटे यांची गच्छंती अटळ मानली जाते.

कोकाटे यांच्या ऑनलाइन पत्ते खेळतानाच्या आणखी दोन चित्रफिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारित केल्या. तत्पूर्वी आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांची भ्रमणध्वनीवर पत्ते खेळतानाची चित्रफीत प्रसारित केली होती. कोकाटे यांनी आपण पत्ते खेळत नव्हतो, असा खुलासा केला असला तरी एकूण तीन चित्रफितींवरून कोकाटे हे विधान परिषद सभागृहात रमी खेळत असल्याचे स्पष्ट होते. कोकाटे हे सभागृहात रमीच्या माध्यमातून ऑनलाइन जुगार खेळत होते, असा आरोप विरोधकांनी केला.

कोकाटे यांच्या वर्तनावरून सर्व थरांतून टीका होत आहे. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये केल्याने कोकाटे हे आधीच अडचणीत आले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) कुचंबणा झाली आहे. यापूर्वीच्या विधानांवरून अजित पवार यांनी समज देऊनही कोकाटे यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. कृषिमंत्री म्हणून कोकाटे यांना फारशी छाप पाडता आलेली नाही वा खात्यावर त्यांचा प्रभाव दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांची गच्छंती केली जाऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून दिले जात आहेत.

माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी चार ते पाच वेळा शेतकऱ्यांविषयी चुकीची वक्तव्ये केली आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांनी समजही दिली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शेतकरी संकटात असताना कृषिमंत्र्यांचे वागणे चुकीचे होते. त्यांचे वर्तन नक्कीच चुकीचे होते. पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे तटकरे यांनी सांगितले. यावरून अजित पवार गट कोकाटे यांना पाठीशी घालण्याचा किंवा वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही, असे स्पष्ट होते.

हा प्रकार भूषणावह नाही : मुख्यमंत्र्यांची नाराजी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वर्तन अतिशय चुकीचे होते आणि जो प्रकार घडला, तो भूषणावह नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कोकाटे हे विधान भवनातील सभागृहात मोबाइलवर रमी खेळत असतानाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याविषयी विचारता फडणवीस म्हणाले, मी मोबाइलवर दुसरे काही बघत असताना रमीचा खेळ पॉप अप झाल्यामुळे दिसत होता, असा खुलासा कोकाटे यांनी केला आहे. पण जे झाले, ते अयोग्य होते.

कोकाटे यांची हकालपट्टी करावी : शशिकांत शिंदे

शेतकऱ्यांची थट्टा करणारे व सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्षाने राजीनामा घेतला पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.