राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी दि गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागाचे सर्वेसर्वा रामकृष्ण नाईक यांची तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका रजनी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. हे पुरस्कार २०१५-१६ या वर्षांसाठीचे आहेत. ५ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नाईक यांनी दि गोवा हिंदू असोसिएशनतर्फे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, संगीत मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटके सादर केली आहेत. तर रजनी जोशी यांनी ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘मृच्छकटिक’ अशा नाटकांतून विविध भूमिका साकारल्या आहेत.