महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचे कथित शुद्धीकरण केल्याचा मुद्दा सोमवारी विधानसभेमध्ये विरोधकांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आणि सरकारने याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र, विरोधकांचे आरोप महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. पाण्याचे शुद्धीकरण केलेले नसून, केवळ राज्य सरकारच्या कार्यक्रमानुसार तिथे जलपूजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. विरोधकांनी यावेळी ‘जय भीम’चा गजर केल्याने कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श करून मानवमुक्तीच्या लढय़ाला सुरुवात केली, त्या तळ्याच्या पाण्याचे ऐतिहासिक महाड सत्याग्रहाच्या वर्धापनदिनी ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला असून, या कथित घटनेबद्दल आंबेडकरी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ब्राह्मण पुरोहिताकडून हे शुद्धीकरण करण्यात आल्याचे आनंदराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक आंदोलन करून वंचित समाजाला न्याय मिळवून दिला. त्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे दलित समाजाचा अपमान झाला आहे. त्यामुळे आता सरकारने या प्रकरणी माफी मागितली पाहिजे.
आमदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासकीय आदेशात कुठेही जलपूजन करण्याचा उल्लेख नाही, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. केवळ जनजागृती करण्यात यावी, एवढाच उल्लेख आदेशात असताना जलपूजन तरी का करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आरोपांना उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, आम्हालाही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे. त्या दिवशी झालेला कार्यक्रम शासकीय होता. चवदार तळ्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आलेले नाही. केवळ सरकारी आदेशानुसार जलपूजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम १९ मार्चला झाला. मात्र, सोशल मीडियावर त्याबद्दल जाणीवपूर्वक चुकीचा संदेश पाठविण्यात आला आणि तो कार्यक्रम २२ मार्चला झाल्याचे पसरविण्यात आले. या मागे कोण आहे, याचा तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahad historic chavdar lake issue raised in maharashtra assembly
First published on: 28-03-2016 at 14:07 IST