सैनिकांच्या पत्नींविषयी वादग्रस्त विधान करणा-या आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबन प्रस्तावावर गुरुवारी विधानपरिषदेच्या सभापतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच परिचारक यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी ९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सभापतींनी यावेळी सांगितले. प्रशांत परिचारक हे भाजपच्या पाठिंब्यावर विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी परिचारकांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती.

बुधवारी विधान परिषदेत प्रशांत परिचारक वादावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले होते. प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांचे निलंबन केले जाईल असे पाटील यांनी सांगितले होते. एखाद्या सदस्याला त्याचे म्हणणे मांडू न देता त्याच्यावर कारवाई करणे योग्य ठरत नाही असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे परिचारक यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमदार प्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांना निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे येथील प्रचारसभेत त्यांची जीभ घसरली होती. या सभेत परिचारक यांनी राजकारण काय असते हे सांगताना सीमेवरील जवानाचा दाखला दिला होता. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’ असे संतापजनक विधान त्यांनी केले होते.