विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिडवल्याचा मुद्दा उपस्थित करत कायमचं निलंबन करण्याची मागणी केली. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्या घटनेच्या बहाण्याने आमच्या आणखी एका सदस्याला निलंबित करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला. नितेश राणेंच्या मुद्यावरुन भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पहायला मिळालं. जाणून घेऊयात नेमकं काय झालं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणेंचं निलंबन करण्याची भास्कर जाधवांची मागणी

“या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफीदेखील मागितली. पण आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असं त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते,” असं सांगत भास्कर जाधव आक्रमक झाले.

“नितेश राणे चुकीचंच बोलले, आमचे सदस्य असले तरी…,” भास्कर जाधवांच्या मागणीनंतर विधानसभेत फडणवीसांचा संताप

“चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.

फडणवीसांनी भास्कर जाधवांना करुन दिली भुजबळांच्या अपमानाची आठवण

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, “या सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचंच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केलं जात अल्याचं दिसत आहे. आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहेत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो की, याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिलं आहे,” अशी आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली.

आदित्य ठाकरे यांना चिडविल्याने शिवसेना आमदार संतप्त; विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी

“भास्कर जाधवांच्या त्या वागण्याचंही समर्थन नाही. पण या सभागृबाहेर जे काही घडलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे त्या गोष्टीचा फायदा घेत निलंबन करण्याच्या हेतूने आले असतील तर लोकशाहीत हे योग्य नाही. आमचे १२ सदस्य निलंबित झाले असून सुप्रीम कोर्टात गेल्याचा आनंद नाही. आमच्यावर ही वेळ आणली जात आहे. इथे कायदा, संविधान मानलं जात नाही. एक-एक वर्ष निलंबन करणं योग्य नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

“भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, नितेश राणे बाहेर बोलले. ते चुकीचं बोलले ही मी जाहीर भूमिका घेतली आहे. माझा सदस्य असला तरी ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यात आहे. पण अध्यक्ष महोदय तुमचा डाव येथे लक्षात येत आहे. तुम्हाला आणखी एक सदस्य निलंबित करायचा आहे,” असा आरोप फडणवीसांनी यावेळी केली. आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई झाली तरी आम्ही लढू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. जी घटना घडली त्याचं समर्थन करणार नाही, त्याचा निषेध करु असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. आमचाही सदस्य असला तरी त्याला जाब विचारु असं यावेळी त्यांनी सांगितलं.

VIDEO: आदित्य ठाकरे येताच ‘म्याव म्याव’ आवाज का दिला?, नितेश राणेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“सरकार बदलत असतं, एकदा पायडं पाडला तर त्यानंतर येणारं सरकार कोणत्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि लोकशाहीची हत्या होईल,” अशी भीती फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली. भास्कर जाधव यांनी हरिभाऊ नानांबद्दल ते म्हटलं आहे ते कामकाजातून काढून टाकावं अशी मागणी फडणवीसांनी यावेळी केली.

भास्कर जाधवांचं उत्तर

“नितेश राणेंना निलंबित करु नका या विरोधी पक्षनेत्यांच्या मताशी मी सहमत आहे. नानांना किती बिस्किटं खायला घातली हे मी बोललेलो नाही. मी त्यांचा अपमान केलेला नाही. नितेश राणेंना निलंबित करा हा माझा आग्रह नाही. उलट भाजपाने आम्ही होता तसा घेतला आणि त्याच्यासारखे घडलो असं सांगितलं पाहिजे. भुजबळांचा विषय काढून त्यांना माध्याविरोधात करण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते विरोधात जाणार नाहीत,” असा विश्वास भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session bjp devendra fadanvis shivsena bhaskar jadhav ncp chhagan bhujabl sgy
First published on: 27-12-2021 at 13:49 IST