भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिडवल्याप्रकरणी विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाल्याचं सोमवारी पहायला मिळालं. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांचं कायमचं निलंबन करावं अशी मागणी धरत जोरदार टीका केली. दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देत भुजबळांचा अपमान केल्याची आठवण करुन दिली.

नितेश राणेंचं निलंबन करण्याची भास्कर जाधवांची मागणी

“या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफीदेखील मागितली. पण आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असं त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते,” असं सांगत भास्कर जाधव आक्रमक झाले.

VIDEO: आदित्य ठाकरे येताच ‘म्याव म्याव’ आवाज का दिला?, नितेश राणेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.

फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, “या सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचंच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केलं जात अल्याचं दिसत आहे. आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो की, याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिलं आहे,” अशी आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली.

आदित्य ठाकरे यांना चिडविल्याने शिवसेना आमदार संतप्त; विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी

“भास्कर जाधवांच्या त्या वागण्याचंही समर्थन नाही. पण या सभागृबाहेर जे काही घडलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे त्या गोष्टीचा फायदा घेत निलंबन करण्याच्या हेतूने आले असतील तर लोकशाहीत हे योग्य नाही. आमचे १२ सदस्य निलंबित झाले असून सुप्रीम कोर्टात गेल्याचा आनंद नाही. आमच्यावर ही वेळ आणली जात आहे. इथे कायदा, संविधान मानलं जात नाही. एक-एक वर्ष निलंबन करणं योग्य नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

“भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, नितेश राणे बाहेर बोलले. ते चुकीचं बोलले ही मी जाहीर भूमिका घेतली आहे. माझा सदस्य असला तरी ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यात आहे. पण अध्यक्ष महोदय तुमचा डाव येथे लक्षात येत आहे. तुम्हाला आणखी एक सदस्य निलंबित करायचा आहे,” असा आरोप फडणवीसांनी यावेळी केली. आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई झाली तरी आम्ही लढू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. जी घटना घडली त्याचं समर्थन करणार नाही, त्याचा निषेध करु असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. आमचाही सदस्य असला तरी त्याला जाब विचारु असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“सरकार बदलत असतं, एकदा पायंडा पाडला तर त्यानंतर येणारं सरकार कोणत्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि लोकशाहीची हत्या होईल,” अशी भीती फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय झालं होतं –

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.