मुंबई: संशयीत दहशतवादी झाकीर हुसेन शेख व  रिझवान इब्राहिम मोमीन यांचा दहशतवाद विरोधी पथकाने(एसीटीएस) पुन्हा ताबा घेतला आहे. ४ ऑक्टोबपर्यंत दोघांचाही ताबा एटीएसला मिळाला.

देशात घातपाती कारवायांच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानातील अ‍ॅन्थोनी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीर हुसेन शेख(५२) विरोधात एटीएसने लुक आऊट सक्युर्लर लागू केले होते. त्यानंतर याप्रकरणी झाकीरला अटक करून त्याच्याविरोधात बेकादेशीर कृत्ये(प्रतिबंधक)अधिनियम, १९६७ अंतर्गत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. झाकीरच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिझवानला अटक केली. त्याच्या मुंब्रा येथील घरी एटीएसने घेतलेल्या झडतीत संशयीत दस्तऐवज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. सध्या दोघांच्याही कोठडीची एटीएसला आवश्यकता नसल्यामुळे झाकीर व मोमीन दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.याप्रकरणी एटीएसला काही माहितीची पडताळणी करायची असल्यामुळे शुक्रवारी दोघांचाही ताबा घेण्यासाठी एटीएसने अर्ज केला होता. त्यानुसार त्याला मंजुरी मिळाली.