मुंबई : महाविकास आघाडी सरकारची राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून नोंद झाली असून, या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात येईल, असे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी जाहीर करण्यात आले. अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदूुत्वाच्या मुद्यावरही आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत भाजपने दिले.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. त्यात भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. ‘हे कायद्याचे राज्य नाही तर काय दे राज्य आहे’, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप सरकारच्या काळात नवीन योजना, विविध विकास कामांची चर्चा व्हायची. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त भ्रष्टाचार, वसुली हेच ऐकू येते, अशी टीकाही त्यांनी केली.

गेल्या आठवडय़ातील अमरावती, नांदेड, मालेगावमधील हिंसाचाराच्या घटनांवरून फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. अमरावती, मालेगावमधील दुसऱ्या दिवशी झालेला हिंसाचार ही हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी मांडले. अमरावती, मालेगाव, नांदेडमधील हिंसाचार हा वेगळा प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. हिंदूंच्या प्रतिक्रियेसाठी भाजप जबाबदार असेल, तर पहिल्या दिवशीच्या दंगलीस शिवसेना जबाबदार होती का, असा सवालही पाटील यांनी केला. हिंदूू आणि महाराष्ट्र धर्मावर महाविकास आघाडी सरकारने घाला घातल्याची टीका आमदार आशिष शेलार यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. हे सरकार लोकोपयोगी कामे करण्यापेक्षा घोटाळेबाजीत रमले असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली.

हिंदूत्वावरून शिवसेनेच्या कोंडीचा प्रयत्न अमरावती, मालेगावच्या घटनेवरून भाजपने पद्धतशीरपणे हिंदूत्वाचा मुद्दा मांडत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र बैठकीत दिसले. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर भाजप नेत्यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. हिंदूमार खाण्यासाठी नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत असत, याकडे लक्ष वेधत भाजप नेत्यांनी त्यांच्या हिंदूुत्वाच्या भूमिकेची आठवणही शिवसेनेला करून दिली.