सध्या राज्यात सुरू असणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा आणखी एक पेपर फुटल्याची बाब समोर आली आहे. गणिताचा सोमवारी होत असलेला पेपर नियोजित वेळेच्या २० मिनिटे आधी व्हॉटस्अपवर व्हायरल झाला आहे. पेपर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी मराठी विषयाचा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सेक्रेट्रियल प्रॅक्टिस (एसपी) या विषयाचा पेपरही व्हायरल झाला आणि आता बारावीच्या गणिताचा पेपर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. आजचा गणिताचा पेपर ११ वाजता होणार होता. मात्र, परीक्षेच्या २० मिनिटे अगोदर म्हणजे १० वाजून ४० मिनिटांनी हा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल झाला. त्यामुळे या गंभीर विषयावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार हेच पाहणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. गुरूवारी बारावीचा मराठीचा पेपर होता. परंतु, ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच फुटल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेपूर्वी सुमारे पाच मिनिटे आधीच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बोर्डाकडे तक्रारही दाखल करण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. सायबर क्राइम सेलकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सचिव दत्तात्रय जगताप यांनी दिली. सोशल मीडियावरुन पेपर लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१५ आणि २०१६ मध्येही अशाच प्रकारे पेपर लीक झाले होते. यंदाही पेपर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी मराठीचा पेपर ११ वाजता सुरु होणार होता. मात्र, विद्यार्थांना १०.३० वाजताच वर्गात सोडण्यात आले होते. त्यानंतर १०.५० वाजता त्यांना पेपर हातात देण्यात आला. त्यामुळे पेपर नक्की कोणी लीक केला याबाबत सध्या बोर्डही साशंक आहे.पेपर अवघ्या काही मिनिटांपूर्वी लीक झाल्याने तो पुन्हा घेण्यात येणार की नाही, याबाबत बोर्डाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बोर्डचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दोनच दिवसांपूर्वी पेपर लीक झाल्याचे फेटाळले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra boards 2017 class 12 paper leak on social media
First published on: 06-03-2017 at 13:39 IST