विधान परिषदेत प्रत्येक आमदाराच्या आसनासमोर टॅब ठेवण्यात आले होते..पेपरलेस कारभाराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले खरे.. परंतु आता गोंधळ घालायचा कसा.. हातातले पेपर एरवी फाडता येत होते.. बोळे करून सभापतींच्या आसनाच्या दिशेने फेकता येत होते.. सदस्यांनी भावना व्यक्त करण्यापूर्वीच सभापतींनी सदस्यांची भावना ओळखून आता टॅब फेकू नका, असे सांगितले आणि स्मितहास्याची एक लकेर सभागृहात उमटली..
डिजिटल इंडिया.. पेपरलेस कारभार हा दृष्टिकोन सभापती रामराजे निंबाळकर यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. सरकारनेही यंदा विधान परिषदेतील सर्व आमदारांना टॅब दिले.. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस. सर्व आमदारांच्या आसनासमोर टॅब दिसत होते; तथापि वायफायमधील अडचणींमुळे ते सुरू होण्यात अडचण येत होती. या टॅबमध्ये १९३७ पासूनच्या विधिमंडळातील कामकाजाच्या माहितीपासून ते विषय पत्रिका, वेगवेगळे अहवाल, ठराव अशी भरगच्च माहिती होती. पेपरलेस कारभाराची सुरुवात करणारे महाराष्ट्र विधिमंडळ हे देशातील पहिले राज्य असल्याचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.. तेव्हा या टॅबमध्ये युतीच्या वादातील कपटी, कोथळा, भ्रष्टाचार, पारदर्शी असे शब्दही असतील अशी ‘अपेक्षा’ राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली, तर विरोधी सदस्यांच्या भाषणातील अडथळा थांबवता येईल, का, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लगेचच मराठीचा ‘झेंडा’ रोवत या टॅबमध्ये सर्व माहिती इंग्रजीत असल्याचे सांगितले. मराठीतही सर्व माहिती उपलब्ध होईल, असे आश्वासन सभापती निंबाळकर यांनी दिले.